नवी दिल्ली: इराणमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, इराणमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना इराणमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही आठवड्यांतील सुरक्षा स्थितीतील बिघाड आणि प्रादेशिक घडामोडींना लक्षात घेता हा महत्त्वपूर्ण सल्ला जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा - पाकिस्तान एअरलाईन्सचा कारनामा..! कराचीच्या तिकिटात सऊदी अरबला पोहोचवलं..!
दरम्यान, बुधवारी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे भारतीय दूतावासाने म्हटले की, गेल्या काही आठवड्यांतील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घडलेल्या घटनांचा विचार करता, भारतीय नागरिकांनी इराणमध्ये अनावश्यक प्रवास करण्यापूर्वी परिस्थितीचे गांभीर्याने मूल्यांकन करावे. दूतावासाने पुढे सांगितले की, इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी स्थानिक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवावे आणि भारतीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
हेही वाचा - अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांसाठी मोठी बातमी! व्हिसा शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
मायदेशी परतणाऱ्यांसाठी सूचना -
तथापी, दूतावासाने स्पष्ट केले की, जे भारतीय नागरिक सध्या इराणमध्ये आहेत आणि ज्यांना भारतात परत यायचे आहेत, त्यांनी उपलब्ध असलेल्या व्यावसायिक विमान किंवा फेरी सेवांचा वापर करावा. हा सल्ला इस्रायली हल्ल्यानंतर इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहे. इराणमधील लष्करी, अण्वस्त्र केंद्रे आणि नागरी ठिकाणांवर हल्ले झाल्यामुळे संपूर्ण परिसरात अस्थिरता वाढली आहे. त्यामुळे दूतावासाने खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.