China Nursing Home Fire: उत्तर चीनमधील हेबेई प्रांतात एक दुर्दैवी अपघात घडला आहे. येथील एका नर्सिंग होमला लागलेल्या आगीत किमान 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चेंगडे शहरातील लोंगहुआ काउंटीमध्ये ही आग लागली. बुधवारी सकाळपर्यंत एकूण 20 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने बुधवारी वृत्त दिले की, इतर 19 जणांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. यामध्ये वृद्ध, महिला आणि मुले यांचा समावेश आहे.
हेही वाचा - 26/11 चा सूत्रधार अखेर भारताच्या तावडीत? तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावरून अमेरिकन न्यायालयाचा मोठा निर्णय
आगीच्या कारणाचा तपास सुरू -
दरम्यान, आगीच्या कारणाचा तपास अजूनही सुरू आहे. स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ते संपूर्ण परिस्थितीची चौकशी करत आहेत आणि अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी नर्सिंग होमच्या प्रभारी व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
हाँगकाँगस्थित साउथ चायना मॉर्निंग पोस्टने जिमू न्यूजचा हवाला देत आपल्या वृत्तात म्हटले आहे की, सार्वजनिक नोंदींनुसार, आगीच्या वेळी 300 बेडच्या गुओएन सिनियर होममध्ये 260 वृद्ध रहिवासी होते. वृद्ध रहिवाशांपैकी 98 जण पूर्णपणे अपंग होते तर 84 जण अर्ध-अपंग होते.
हेही वाचा - जगातील सर्वात शक्तिशाली देशाला 'या' आजाराचा विळखा; अनेकांचा मृत्यू
या वर्षी जानेवारीमध्ये चीनच्या हेबेई शहरातील झांगजियाकौ येथील एका बाजारपेठेत आग लागली होती. या आगीच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. तथापी, एक महिन्यापूर्वी, पूर्व चीनमधील रोंगचेंग शहरात एका बांधकाम साइटला लागलेल्या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. बांधकाम नियमांचे पालन न केल्याने आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबाबत अनेकदा दुर्लक्षित वृत्तीमुळे चीनमध्ये प्राणघातक आगीच्या घटना सामान्य आहेत.