Yemen Boat Capsized: येमेनमध्ये रविवारी सकाळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. आफ्रिकेतील स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट अब्यान प्रांताच्या किनाऱ्यावर उलटली. या बोटीत 68 स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून 74 जण बेपत्ता आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संस्थेने (IOM) याबाबत माहिती दिली आहे.
आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेचे येमेनमधील प्रमुख अब्दुसत्तार एसोएव यांनी सांगितले की, इथिओपियातून निघालेली ही बोट 154 स्थलांतरितांसह खानफार जिल्ह्यात किनाऱ्यावर उलटली. यातून केवळ 12 जणांना वाचवण्यात यश आलं, तर उर्वरित लोक बेपत्ता आहेत. तसेच बहुतेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - 26 आयफोन शरीराला चिकटवले...! 20 वर्षीय तरुणीचा बसमध्ये गुदमरून मृत्यू
किनाऱ्यावर मृतदेहांचा खच -
अपघातानंतर 54 मृतदेह किनाऱ्यावर सापडले. तसचे इतर 14 मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. या प्रकरणाची चौकशी सुरू असून बचावकार्यासाठी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. येमेनमधील अपघात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्थलांतर संकटाची तीव्रता दर्शवतो. गेल्या अनेक वर्षांपासून आफ्रिकेच्या शिंगातून आखाती देशांमध्ये कामाच्या शोधात येणारे स्थलांतरित येमेनमार्गे धोकादायक समुद्रमार्गाने प्रवास करतात. तस्कर त्यांच्या जीवाशी खेळत अशा गर्दीच्या व असुरक्षित बोटींमध्ये त्यांची वाहतूक करतात.
हेही वाचा - युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला; सोचीजवळील रशियन तेल डेपोला भीषण आग
यापूर्वीही घडले आहेत अपघात -
आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या अहवालानुसार, मार्च 2024 मध्ये चार बोटी उलटून 188 लोकांचा मृत्यू झाला होता. 2024 मध्ये आतापर्यंत 60 हजार पेक्षा अधिक स्थलांतरितांनी येमेनमध्ये प्रवेश केला आहे. 2023 मध्ये ही संख्या 97,200 होती.