Thailand Airstrike on Cambodia प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
Thailand's Airstrike on Cambodia: थायलंड आणि कंबोडियामधील वर्षानुवर्षे सुरू असलेला सीमा वाद पुन्हा भडकला आहे. या संघर्षाने आता गंभीर वळण घेतले आहे. गुरुवारी दोन्ही देशांच्या सीमांवर गोळीबार झाला. त्यानंतर थायलंडच्या हवाई दलाने कंबोडियाच्या ओड्डार मीन्चे आणि प्रेह विहार प्रांतांतील दोन लष्करी तळांवर हवाई हल्ले केले. एफ-16 लढाऊ विमानांद्वारे करण्यात आलेल्या या कारवाईत कंबोडियाचे लष्करी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.
हल्ल्याच्या काही तासांपूर्वी सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये भीषण चकमक झाली होती. कंबोडियाचे संरक्षण प्रवक्ते जनरल माली सोचेता यांनी सांगितले की, 'थाई सैनिकांनी आमच्या हद्दीत घुसखोरी केली, त्यामुळे आम्ही प्रत्युत्तर दिले.' कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी यावेळी शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी थायलंडवर ता मोन थॉम आणि ता काब्रे मंदिरांवर हल्ल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा - रशियामध्ये 50 प्रवाशांना घेऊन जाणारे अंगारा एअरलाइन्सचे विमान कोसळले
संघर्षात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू -
सध्या दोन्ही देशांमध्ये तब्बल 8 ठिकाणी संघर्ष सुरू आहे. या संघर्षात जड शस्त्रास्त्रांचा वापर केला जात आहे. थायलंड आणि कंबोडिया संघर्षात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही देशांचे सैनिक आणि नागरिकांचा समावेश आहे. कंबोडियन हल्ल्यात दोन थाई सैनिक ठार झाल्याचेही वृत्त आहे. या संघर्षामुळे चीनने आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना सीमा भागांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा - दुर्दैवी! बांगलादेशातील विमान अपघातात 16 विद्यार्थी, 2 शिक्षकांसह 19 जणांचा मृत्यू
40 हजार नागरिकांचे स्थलांतर
दरम्यान, थायलंड आणि कंबोडिया संघर्षामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. थायलंड सरकारने 86 गावांमधील सुमारे 40 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. सीमेवर तणावाची स्थिती कायम असून, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.