Bangladesh Air Force Plane Crash
Edited Image
ढाका: बांगलादेशात सोमवारी अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. ढाकाजवळील उत्तरा परिसरात बांगलादेश हवाई दलाचे एक F-7 BGI लढाऊ प्रशिक्षण विमान थेट एका शाळेच्या इमारतीवर कोसळले. या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये बहुसंख्य पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेत 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघातग्रस्त विमान चीनी बनावटीचे होते -
हा अपघात दुपारी 1:30 वाजता माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या परिसरात घडला. चीनमध्ये बनलेले हे F-7 विमान प्रशिक्षणासाठी वापरण्यात येत होते. अपघातानंतर मोठा स्फोट झाला आणि इमारतीला भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या, लष्कराचे जवान आणि बचाव पथकांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे.
शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान -
दरम्यान, विमान अपघातानंतर इमारतीचा एक भाग कोसळला. तथापी, बचावकार्यादरम्यान शाळेच्या परिसरातून 19 मृतदेह सापडले आहेत. विमानाच्या ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानाचा वैमानिक सध्या लष्करी रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये उपचार घेत आहे.
हेही वाचा - इंडोनेशियात 280 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला भीषण आग, पहा व्हिडिओ
शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, ज्या इमारतीवर विमान आदळले, तिथे लहान मुलांचे वर्ग सुरू होते. प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विमान मोठ्या आवाजात वेगाने खाली आले आणि काही क्षणातच स्फोट झाला. त्यानंतर आगीने संपूर्ण इमारत व्यापली.' या अपघातातील 72 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी आठ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - हवेत विमानाच्या इंजिनला लागली आग! पायलटने वाचवला 294 प्रवाशांचा जीव
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता -
सध्या बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर बांगलादेश सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी आहे. तथापी, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.