Thursday, August 21, 2025 12:38:27 AM

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला; सोचीजवळील रशियन तेल डेपोला भीषण आग

या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 120 हून अधिक अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या आगीचे थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला सोचीजवळील रशियन तेल डेपोला भीषण आग
Ukraine drone attack on Russia प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

मॉस्को: रविवारी रात्री युक्रेनने रशियाच्या काळ्या समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या सोचीजवळील तेल डेपोवर जोरदार ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात भीषण आग लागली. या आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दूरवरूनही दिसत आहेत. रशियन अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली असून या घटनेमुळे रशिया-युक्रेन संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

इंधन टाकीवर पडला ड्रोनचा मलबा - 

क्रास्नोडार प्रांताचे गव्हर्नर वेनियामिन कोंड्रात्येव्ह यांनी सांगितले की, ड्रोन पाडल्यानंतर त्याचा मलबा थेट इंधनाच्या टाकीवर आदळल्यामुळे आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 120 हून अधिक अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या आगीचे थरारक व्हिडिओ व्हायरल होत असून, सोची विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार नाही

व्होरोनेझमध्येही ड्रोन हल्ला - 

दरम्यान, रशियाच्या व्होरोनेझ प्रदेशातही युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे चार नागरिक जखमी झाले आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत 93 युक्रेनियन ड्रोन पाडण्यात आले. तर युक्रेनने सांगितले की, रशियाने देखील 76 ड्रोन व 7 क्षेपणास्त्रे डागली असून त्यापैकी 60 ड्रोन आणि एक क्षेपणास्त्र पाडण्यात यश आले आहे.

हेही वाचा - ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा परिणाम! भारताने अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमान खरेदीस दिला नकार

तथापी, दक्षिण युक्रेनमधील मायकोलाईव्ह शहरात रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 7 जण जखमी झाले आहेत. याशिवाय, काही दिवसांपूर्वी रशियन हल्ल्यात 5 मुलांसह 31 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 150 हून अधिक जण जखमी झाले होते. दरम्यान, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना 8 ऑगस्टपर्यंत युद्धबंदीबाबत अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी स्टीव्ह विटकॉफ यांना विशेष दूत म्हणून रशियात पाठवले असून, प्रगती न झाल्यास नव्या आर्थिक निर्बंधांचा इशाराही दिला आहे.
 


सम्बन्धित सामग्री