Beed Crime: बीड जिल्हा पुन्हा एकदा गुन्ह्यामुळे हादरला आहे. परळी तालुक्यातील एका गावात परप्रांतीय तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेने स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे.प्राथमिक माहितीनुसार, 20 वर्षीय तरुणी मुंबईवरून हैदराबादला जाण्यासाठी प्रवास करत होती. प्रवासादरम्यान ती परळी रेल्वे स्थानकावर उतरली. तेथे ती जवळच्या हॉटेलमध्ये जेवत असताना, स्थानिक तृतीयपंथी व्यक्तीने तिच्याशी संवाद साधला. काम देण्याचे आश्वासन देत तिने तरुणीला विश्वासात घेतले आणि आपल्या साथीदारांना बोलावून घेतले.
हेही वाचा: Beed Crime: बीडच्या गेवराईत महिलेवर गोळीबार, दवाखान्यात उपचार सुरु तरीही पोलीस अनभिज्ञच
यानंतर संशयितांनी पीडितेला दुचाकीवर बसवून तालुक्यातील एका दुर्गम भागात नेले. तिथे तिघांनी तिच्यावर जबरदस्ती केली. घटनेदरम्यान गावातील एका सतर्क नागरिकाने पोलिसांच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती दिली. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तिघा आरोपींना ताब्यात घेतले. चौथी संशयित व्यक्ती अद्याप फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत आहे. विशेषतः दुर्गम आणि निर्जन भागात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अटक केलेल्या आरोपींवर बलात्कार, अपहरण आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अटक आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असून त्यांच्याकडून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाईल.
हेही वाचा: Ratnagiri Crime : 'या' छोट्याशा पुराव्यामुळे सापडला चिपळूणमधील शिक्षिकेचा खुनी ; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
दरम्यान, या घटनेवरून जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सामाजिक संघटनांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रभावी गस्त, सीसीटीव्ही व्यवस्था, तसेच महिलांसाठी सुरक्षित प्रवासाची हमी यासारख्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच परप्रांतीय आणि स्थलांतरित कामगारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र धोरण आखण्याची गरज असल्याचेही स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचे मत आहे.
ही घटना केवळ एका तरुणीवर झालेला अन्याय नसून, संपूर्ण समाजाच्या सुरक्षेच्या भावनेवर घाव आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणणे आवश्यक आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.