Wednesday, August 20, 2025 09:21:46 AM

1200 रुपयांसाठी अपहरण अन् निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; रक्त गोठवणारी बीडची कहाणी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. अशातच, बीडमध्ये माणुसकीला काळिमा फसवणारी आणि रक्त गोठवणारी घटना घडली आहे.

1200 रुपयांसाठी अपहरण अन् निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण रक्त गोठवणारी बीडची कहाणी

बीड: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. अशातच, बीडमध्ये माणुसकीला काळिमा फसवणारी आणि रक्त गोठवणारी घटना घडली आहे. 1200 रुपयांच्या वादातून, एका ऊस तोडणी कामगाराने आणि त्याच्या साथीदारांनी एका शेतमजुराचे अपहरण केले. त्यानंतर, शेतमजुराला वाचवण्यासाठी गेलेले निवृत्त पोलिस अधिकारी राजाराम सिरसाट यांना ऊस तोडणी कामगार आणि त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण केली. इतकेच नाही, तर त्यांच्याकडून दीड लाख रुपये लुटण्यात आले आणि त्यांच्या तोंडावर लघुशंका करून त्यांना अमानुष वागणूक देण्यात आली. या घटनेत, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांचा शेतगडी विश्वनाथ पंडितचे 1200 रुपये ऊसतोड मुकादम राजू शेख आणि बाबू शेख (रा. मंजरथ ता. माजलगाव जि.बीड) यांना देणे होते. या 1200 रुपयांसाठी, मुकादमाने आणि त्याच्या साथीदाराने शेतगडी विश्वनाथ पंडितचे अपहरण केले. त्यानंतर, मुकादमाने आणि त्याच्या साथीदाराने शेतगड्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा, स्वतःचा बचाव करण्यासाठी शेतगडी विश्वनाथ पंडितने शेत मालक आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांना फोन करून, 'मुकादम आणि त्याचे साथीदार आपल्याला मारहाण करत आहेत', अशी माहिती दिली. 

या घटनेची माहिती मिळताच जेव्हा, शेत मालक आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांनी संबंधित मुकादमाकडे फोनवरून विचारणा केली. तेव्हा, मुकादम म्हणाला की, 'दीड लाख रुपये द्या आणि शेतगड्याला घेऊन जा'. यावर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांनी मुकादमास विचारले की, 'दीड लाख रुपये दिल्यानंतर तुम्ही माझ्या शेतगड्याला सोडणार का?'. यावर, मुकादम म्हणाला की, 'पैसे घेऊन या त्याला सोडतो'. त्यानंतर राजाराम सिरसट यांनी घरी जाऊन दीड लाख रुपये घेतले आणि मुकादमाने सांगितलेल्या ठिकाणी गेले.

हेही वाचा: शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; जामीन अर्जाला पोलिसांकडून विरोध

यादरम्यान, मुकादम शेख राजू, शेख बाबू आणि त्याच्या साथीदारांनी मिळून शेतगड्यासह सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत राजाराम सिरसट गंभीर जखमी झाले होते. या गंभीर जखमी अवस्थेत, राजाराम सिरसाट यांना जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून माजलगाव तालुक्यातील ढोरगाव आणि लवूल शिवारातील घनदाट जंगलात नेण्यात आले. यादरम्यान, मुकादमाने आणि त्याच्या साथीदारांनी लाठ्या, धारदार शस्त्र आणि रिव्हॉल्व्हरचा वापर करून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांना जखमी केले. इतकेच नाही तर त्यांच्याकडून दीड लाख रुपये लुटण्यात आले, त्यांच्या तोंडावर लघवी करण्यात आली आणि त्यांना अमानुष वागणूक देण्यात आली. याची माहिती मिळताच सिरसट यांचा मुलगा त्याठिकाणी पोहोचला. मुलगा पोहोचताच आरोपी पळाले, मात्र एक आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. गंभीर जखमी अवस्थेत राजाराम सिरसट यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ पैशासाठी झालेली ही क्रूर घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी आहे.


सम्बन्धित सामग्री