छत्रपती संभाजीनगर: समाजकल्याण विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याविरोधात एक गंभीर प्रकार समोर आला आहे. समाज कल्याण विभागाच्या उपआयुक्त पदावर कार्यरत असलेल्या जयश्री सोनकवडे या महिला अधिकाऱ्यांवर कंत्राटी महिला कामगारांकडून घरी बोलावून मसाज व घरगुती काम करवून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे.
संबंधित पीडित महिलेने थेट समाजकल्याण आयुक्तांकडे तक्रार सादर केली आहे. या तक्रारीनुसार, पीडित महिला 2023 पासून समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 4 मध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होती. त्या वसतिगृहामध्ये गृहप्रमुख म्हणून वैशाली कलासरे कार्यरत होत्या. त्यांच्या सांगण्यावरून पीडित महिलेस जयश्री सोनकवडे यांच्या घरी घरगुती कामासाठी पाठवण्यात आले. त्या ठिकाणी आणखी एक महिला कर्मचारी सोनाली बागुल हिला देखील कामासाठी बोलावले गेले.
हेही वाचा: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
पीडित महिलेच्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे की, जयश्री सोनकवडे या महिलांकडून नियमितपणे विविध कामं करून घेत होत्या. एवढंच नाही तर त्या महिलांना हिणकस वागणूक देत, त्यांच्यावर दया न दाखवता 'बावळट बायका', 'नाटक करणाऱ्या' अशा अपमानास्पद शब्दांत हिणवत होत्या. काम करून घेतल्यानंतरही योग्य तो सन्मान वा आदर न देता महिलांना हलकं लेखणं हे त्यांचं वर्तन असल्याचं तक्रारीत नमूद आहे.
जयश्री सोनकवडे या 2022 ते मार्च 2025 पर्यंत समाज कल्याण उपआयुक्त पदावर कार्यरत होत्या. मार्च 2025 मध्ये त्यांची प्रशासकीय बदली झाली असून सध्या त्या छत्रपती संभाजीनगर येथील जात पडताळणी समितीमध्ये उपआयुक्त तथा सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
हेही वाचा: 8 व 9 जुलैला राज्यातील शाळा बंद; नेमकं कारण काय? जाणून घ्या
एप्रिल 2025 मध्ये पीडित महिलेची बदली पुष्पा नगरी येथील वसतिगृहात झाली. मात्र तिने स्पष्ट केलं की, बदलीनंतर देखील आठवडाभर जयश्री सोनकवडे यांनी तिच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले. या प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासन व समाज कल्याण विभागात एकच खळबळ उडाली आहे.