मुंबई: दैनंदिन जीवनात आपल्यापैकी बरेच जण आता दूध, ब्रेड, इतर खाण्याचे पदार्थ ऑनलाइन मागवतात. वेळ वाचतो, झटपट डिलिव्हरी मिळते आणि सोयही होते. पण, यामागे सुरू असलेल्या एका गंभीर प्रकाराची माहिती समोर आल्याने अनेक ग्राहक धास्तावले आहेत.
दिल्लीमध्ये अन्न व औषध प्रशासनाने काही ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध गंभीर आरोपांच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती उघड केली आहे. काही कंपन्या दूध, ब्रेडसारख्या लवकर खराब होणाऱ्या वस्तूंवरून एक्सपायरी डेट काढून त्या विकत होत्या. अशा वस्तू खाल्ल्यास केवळ पोट बिघडणेच नव्हे तर गंभीर आजार होण्याचा धोका देखील वाढतो.
काय उघड झालं?
एका नागरिकाने तक्रार केली की, त्यांना फफूंद लागलेली ब्रेड डिलीवर झाली. त्यानंतर अन्न सुरक्षा विभागाने तपास सुरु केला. चौकशीत आढळून आले की, कंपनीकडून मिळालेली ब्रेड एक्सपायर झालेली होती. मात्र त्या ब्रेडवरून एक्सपायरी डेट हटवली गेली होती.
पुढील तपासात असं लक्षात आलं की हा प्रकार प्रत्यक्ष ब्रेड बनवणाऱ्या कंपनीकडून नव्हे, तर ई-कॉमर्स डिलिव्हरी कंपनीकडून करण्यात येत होता. त्यामुळे या कंपनीचा परवाना एका महिन्यासाठी रद्द करण्यात आला आहे.
ग्राहकांनी काय करावं?
जर तुम्हाला एखादा एक्सपायर प्रोडक्ट मिळाला असेल, तर:
1. सर्वप्रथम संबंधित ई-कॉमर्स कंपनीशी संपर्क साधा आणि रिफंड किंवा रिप्लेसमेंटची मागणी करा.
2. समाधान न झाल्यास, उपभोक्ता संरक्षण संस्था किंवा खाद्य सुरक्षा विभाग यांच्याकडे तक्रार दाखल करा.
3. खाद्य सुरक्षा विभागाचा हेल्पलाईन क्रमांक: 1800113921 वर कॉल करूनही तक्रार करता येते.
ऑनलाइन सुविधांचा वापर करताना ग्राहकांनीही सतर्क राहणं गरजेचं आहे. डिलिव्हरीच्या वेळी प्रोडक्टची एक्सपायरी डेट तपासा. कारण हे प्रकरण केवळ फसवणुकीचं नाही, तर तुमच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे.