Wednesday, August 20, 2025 10:19:17 AM

आमदार अमित देशमुखांच्या कंपनीत तब्बल इतक्या कोटींचा आर्थिक गैरव्यवहार; आत्तेभावासह दोघांवर गुन्हा दाखल

आमदार अमित देशमुखांच्या मालकीच्या लातूर येथील 'इंडोमोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत तब्बल 9 कोटी 27 लाख 95 हजार 763 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.

आमदार अमित देशमुखांच्या कंपनीत तब्बल इतक्या कोटींचा आर्थिक गैरव्यवहार आत्तेभावासह दोघांवर गुन्हा दाखल

अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर: राज्याचे माजी मंत्री तथा लातूर शहराचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या मालकीच्या लातूर येथील 'इंडोमोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत तब्बल 9 कोटी 27 लाख 95 हजार 763 रुपयांची फसवणूक करून आर्थिक गैरव्यवहार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमित देशमुख यांचे आतेभाऊ सत्यजित दासराव देशमुख यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, अमित देशमुख यांच्या मातोश्री वैशालीताई देशमुख, लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख हे संचालक असलेल्या इंडो मोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मागील 30 वर्षापासून दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांच्या विक्रीचा व्यवसाय करते. ही कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा, पियाजोओ, हिरो मोटार कार्पोरेशन लिमिटेड या वाहन उत्पादक कंपनीचे लातूर व धाराशिव जिल्ह्यातील अधिकृत डीलर आहेत. अमित देशमुख यांच्या सख्ख्या आत्याचे चिरंजीव (आतेभाऊ) सत्यजित देशमुख हे 'इंडोमोबाईल ' कंपनीत सन 2005-2024 असे तब्बल 19 वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कार्यरत होते. तर महाव्यवस्थापक म्हणून मल्लिकार्जुन माकणे व सेल्स विभागातील चॅम्पियन व महाव्यवस्थापक सुप्रिया बिरादार हे कार्यरत होते.

हेही वाचा: अहिल्यानगर महापालिकेतील रस्त्यांच्या कामात 350 ते 400 कोटींहून अधिक महाघोटाळा

कंपनीचे सर्वाधिकार सत्यजित देशमुख यांना देण्यात आले होते. त्याचाच गैरफायदा घेऊन या तिघांनी एकमताने कंपनीचे आर्थिक नुकसान व्हावे व स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा हा हेतू बाळगला. या हेतूने कंपनीचा व्यवसाय दुसरीकडे वळवणे, ग्राहकांकडून जास्तीची रक्कम घेऊन कंपनीला कमी रक्कम दर्शविणे, डेमोकार विक्री अपहार, कंपनीला मिळणारे आर्थिक लाभ स्वतःकडे वळवणे, कंपनीतील स्पेअर पार्टच्या नोंदी न करता परस्पर रोखीने विक्री करणे यांसारखी कृत्य करुन आर्थिक गैरव्यवहार करत कंपनीच्या संचालक मंडळाची फसवणूक केली आहे. संचालक मंडळाने प्राधिकृत केलेले वकील राजेंद्र दिगंबर काळे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम- 316(4),318(4), 61(2),3(5) अन्वये सत्यजित दासराव देशमुख, मल्लिकार्जुन रेवनसिद्धाप्पा माकणे, सुप्रिया मारुती बिरादार यांच्यावर लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. 

लातूरच्या 'इंडोमोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी'च्या संचालक मंडळात आमदार अमित देशमुख यांच्या मातोश्री वैशालीताई देशमुख, लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख हे असून अमित देशमुख यांचे सख्खे आतेभाऊ  (आत्याची चिरंजीव) सत्यजित  देशमुख यांनीच आर्थिक गैरव्यवहार करत देशमुख परिवाराची फसवणूक केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


सम्बन्धित सामग्री