Wednesday, August 20, 2025 09:24:12 AM

Jalgaon Crime: लेडी सिरीयल किलरचा थरार; दोन महिलाचा खून करुन तिसरी थोडक्यात वाचली

जळगाव जिल्ह्यात एक मन सुन्न करणारा सिरीयल किलिंग प्रकरण उघडकीस आलं आहे. अनिल गोविंदा संदानशिव  या नराधमाने महिलांशी प्रेमाचे नाटक करुन त्यांचा विश्वास संपादन करायचा.

jalgaon crime लेडी सिरीयल किलरचा थरार दोन महिलाचा खून करुन तिसरी थोडक्यात वाचली

जुगल पाटील, प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यात एक मन सुन्न करणारा सिरीयल किलिंग प्रकरण उघडकीस आलं आहे. अनिल गोविंदा संदानशिव  या नराधमाने महिलांशी प्रेमाचे नाटक करुन त्यांचा विश्वास संपादन करायचा. तसेच शरीर संबंध प्रस्थापित केल्यानंतर, त्यांचा खून करून मृतदेह जंगलात फेकल्याचे निष्पन्न झाले आहे. या सिरीयल किलरने शोभाबाई कोळी व वैजंताबाई भोई या दोन महिलांचा खून केल्याचे कबूल केले असून शाहनाज बी या तिसऱ्या महिलेचा प्रयत्न अपयशी ठरल्याने त्या थोडक्यात बचावल्या आहेत. 

अनिल संदानशिवचे शब्द गोड होते, वागणं सोज्वळ...कोणत्याही महिलेचं मन जिंकण्याचं असं काही जाळं त्याच्याकडे होतं, की प्रेमात पडल्याशिवाय पर्यायच नसायचा. पण जेव्हा विश्वास संपादन केला जायचा. तेव्हा मृत्यूची खरी योजना सुरू व्हायची. जळगाव जिल्ह्यातला एक थंड डोक्याने विचार करणारा ‘लेडी सिरीयल किलर’ स्टाईलचा खुनी, तो म्हणजे अनिल गोविंदा संदानशिव. शोभाबाई कोळी आणि वैजयंताबाई भोई या दोघींना त्याने गोड बोलून फसवलं, संबंध ठेवले, आणि मग जंगलात नेऊन दगडाने ठेचून ठार मारलं. तिसरी महिला शाहनाज बी थोडक्यात वाचली. पण तिचंही नियोजन ठरलेलं होतं. प्रेमाच्या मुखवट्यामागे लपलेला ‘प्रेते उगाळणारा विकृत’ अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.

वैजंताबाईंसोबत ‘सुरत’पासून मृत्यूच्या प्रवासाला सुरुवात 

या खुनांपैकी एक अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, वैजयंताबाई भोई यांची अनिल संदानशिव याच्याशी सुरत येथे ओळख झाली होती. सुरत येथे अनिल काही काळ वास्तव्यास होता आणि तेथे काम करत असताना त्याची वैजयंताबाई यांच्याशी जवळीक वाढली. गोड गप्पा, प्रेमाचे नाटक आणि विश्वास संपादन करत अनिलने वैजयंताबाई यांना आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर दोघे एकत्रितपणे जळगाव जिल्ह्यात परतले. वैजयंताबाई यांना वाटले की, हे खरं प्रेम आहे, पण हाच प्रवास त्यांच्यासाठी अखेरचा ठरला.

हेही वाचा: पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक

2 मे रोजी त्या आपल्या मूळगावी परत आल्या आणि काही दिवसांतच अनिलने त्यांना सुमठाणे शिवारातील जंगलात नेले. तिथे तिचा निर्घृण खून करून मृतदेह फेकून दिला. 23 जुलै रोजी पोलिसांना तिचे आधारकार्ड, चप्पल, हाडांचे अवशेष मिळाले आणि तिची ओळख पटली.

पहिल्या खूनाचं रहस्य

25 जून रोजी सुमठाणे जंगलात शोभाबाई रघुनाथ कोळी यांचा मृतदेह आढळून आला. तिच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. गोणीमध्ये मृतदेह ठेवून फेकण्यात आला होता. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अनिल संदानशिव याला अटक करण्यात आली.

शाहनाज बी थोडक्यात बचावल्या 

अनिल संदानशिव याने शाहनाज बी यांनाही त्याच जंगलात गोड बोलून बोलावले होते. तिथे डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केला, मात्र शाहनाज यांनी जोरदार आरडाओरड केल्याने काही लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. अनिल घटनास्थळावरून फरार झाला. त्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या.

खून करण्याची शैली आणि ठिकाण ठरलेलं  

अनिल संदानशिव बसमध्ये, गावात, कामाच्या ठिकाणी महिलांशी गोड बोलून ओळख वाढवायचा. त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवायचा. त्यानंतर विश्वास संपादन करून सुमठाणे शिवारातील सामाजिक वनीकरणाच्या जंगलात नेऊन, डोक्यात दगड घालून खून करायचा. खून करण्याआधी तो त्यांच्याकडील दागिने, पैसे लुटायचा. अनिल संदानशिव या सिरीयल किलरच्या कृत्यांमुळे जळगाव जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान पोलिस प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.
 


सम्बन्धित सामग्री