शनिशिंगणापूर: शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेले नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी (28 जुलै) सकाळी 8 वाजता त्यांच्या राहत्या घरी छताला गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आणि आत्महत्येचं नेमकं कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
हेही वाचा: आईच झाली वैरिण! पोटच्या मुलींना जेवणातून विष देऊन केलं ठार
नितीन शेटे हे 2021 पासून शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या देवस्थानच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या बनावट ऑनलाईन अँप प्रकरणी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अनेक पदाधिकाऱ्यांचे आणि पुजाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. मात्र, नितीन शेटे यांना या चौकशीसाठी कधीही पोलिसांनी बोलावले नव्हते किंवा त्यांना समन्सही बजावण्यात आले नव्हते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. त्यामुळे जर शेटे यांच्यावर चौकशीचा सासेमीरा नव्हता तर त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली याबाबत पोलीस तपास करत आहे. खरंतर शेटे यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणाहून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहे मात्र या घटनेमुळे संपूर्ण देवस्थान परिसरात शोककळा पसरली आहे.