Wednesday, August 20, 2025 09:32:25 AM

मेकअप आणि स्पा सेंटरच्या आड देहव्यवसाय; पाच महिला व दोघे पुरुष अटकेत

गोंदियातील स्पा सेंटरमध्ये मेकअप आणि मसाजच्या नावाखाली देहव्यवसाय; पाच महिला, दोन पुरुष अटकेत. पोलिसांनी धाड टाकून दोघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

मेकअप आणि स्पा सेंटरच्या आड देहव्यवसाय पाच महिला व दोघे पुरुष अटकेत

गोंदिया: गोंदिया शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जयस्तंभ चौकातील बस स्टॉप समोर चालणाऱ्या 'मॉस मेकअप स्टुडिओ एन्ड द बॉडी स्पा सेंटर' मध्ये मेकअप आणि मसाजच्या नावाखाली देहव्यवसाय सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पोलिसांनी कारवाई करत पाच महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने बनावट ग्राहक पाठवून कारवाई केली. धाड टाकली असता एका खोलीत एका महिलेस ग्राहकासोबत आढळून आल्यावर तिची विचारपूस करण्यात आली. यामध्ये संबंधित महिलेनं स्पष्टपणे सांगितलं की, या स्पा सेंटरचे मालक बळीराम घोटेकर आणि त्याचा भाऊ दिलीप घोटेकर या दोघांनी जबरदस्तीने व पैशांचे आमिष दाखवून तिला देहव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. पोलिसांनी पुढे तपास केल्यावर स्पा सेंटरच्या पहिल्या मजल्यावर आणखी पाच महिला आढळून आल्या. त्यांनीही तशाच स्वरूपाचे खुलासे केले.

हेही वाचा: Gulabrao Devkar: 10 कोटींच्या कर्जप्रकरणात माजी मंत्री गुलाबराव देवकर ठरले दोषी

बळीराम घोटेकर व दिलीप घोटेकर हे दोघे गोंदियाचे रहिवासी असून, ते मॉस मेकअप स्टुडिओ आणि द बॉडी स्पा सेंटरचे मालक आहेत. पोलिसांनी सांगितले की, या दोघांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना फसवून व पैशांचे आमिष देत स्पा सेंटरच्या आड देहव्यवसाय चालवला होता.

ही धाडसत्र पूर्ण झाल्यानंतर, पोलिसांनी सर्व पुरावे एकत्र करून संबंधित दोघांवर वसतिगृह व्यवस्थापन व अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, 1956 अंतर्गत गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्षतेमुळे उघडकीस आली असून, गोंदिया शहरात अशा प्रकारचे बोगस स्पा सेंटरच्या नावाखाली चालणारे व्यवसाय रोखण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास व कारवाई सुरु आहे.


सम्बन्धित सामग्री