स्पीड ब्रेकरचा अभाव जीवघेणा; वसईत अपघातांची मालिका सुरूच
मुंबई : वसई पूर्वेतील मधुबनमधील सुरक्षा स्मार्ट सिटी रस्त्यावर रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडला. हिरो होंडा स्प्लेंडर प्लस आणि स्कुटी या दोन मोटारसायकल एकमेकांसमोर आदळल्याने हा भीषण अपघात झाला. अपघात इतका जोरदार होता की, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नसून वालीव पोलीस पुढील तपास करत आहेत.
मधुबन परिसरातील मुख्य रस्ता हा अत्यंत गजबजलेला असून, रात्रीच्या सुमारास येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, मुख्य रस्त्यावर कुठेही स्पीड ब्रेकर नसल्याने वाहनांचे वेग अत्यंत जास्त असतो, त्यामुळे अपघातांची संख्या सातत्याने वाढत आहे. याआधीही या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत, मात्र यावर ठोस उपाययोजना केली जात नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. काही स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र तिघेही अत्यवस्थ असल्याने त्यांना वाचवता आले नाही. माहिती मिळताच वालीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "प्रशासनाने रस्त्यावरील स्पीड ब्रेकर लावले असते, तर हा अपघात टाळता आला असता," अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे आणि आवश्यक ती उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
वालीव पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत होते का, किंवा वेगमर्यादा ओलांडली होती का, याची चौकशी केली जात आहे. तसेच, मृतांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.