Wednesday, August 20, 2025 11:31:14 AM

विद्यादीप बालगृहातील मुलींच्या छळप्रकरणी तीन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी

विद्यादीप बालगृहातील छळप्रकरणी वेलरी जोसेफ, सुचिता गायकवाड आणि अलका साळुंके यांना न्यायालयीन कोठडी; 9 मुलींनी बालगृहातील अमानवी वागणुकीविरोधात न्यायालयात धाव घेतली.

विद्यादीप बालगृहातील मुलींच्या छळप्रकरणी तीन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील विद्यादीप बालगृहातील अमानवी वागणुकीच्या विरोधात आवाज उठवत नऊ अल्पवयीन मुलींनी थेट न्यायालयाचा रस्ता धरल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ माजवली आहे. या प्रकरणात बालगृहातील तीन महिला सहायक अधीक्षिका वेलरी भगवान जोसेफ, सिस्टर सुचिता भास्कर गायकवाड आणि केअरटेकर अलका फकीर साळुंके यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

30 जून रोजी बालगृहातून नऊ अल्पवयीन मुली अचानक बाहेर पळाल्या आणि "न्याय द्या, न्याय द्या" अशा आरोळ्या देत शहरभर फिरू लागल्या. त्यांच्या अंगावर जखमा, फाटलेले कपडे आणि भीतीने भरलेले चेहरे पाहून शहरात एकच खळबळ उडाली. या मुलींनी सुमारे तीन किलोमीटरचे अंतर पळत पार करून थेट जिल्हा न्यायालय गाठले आणि न्यायाची मागणी केली. प्राथमिक चौकशीत या मुलींनी सांगितले की, त्यांना बालगृहात मूलभूत सुविधा दिल्या जात नव्हत्या. किरकोळ कारणांवरून त्यांना मारहाण केली जात होती. साबण, टूथपेस्ट यांसारख्या साध्या गोष्टींपासूनही वंचित ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे मुलींच्या मनात भीती निर्माण झाली होती.

हेही वाचा: साबण, टूथपेस्ट देत नाहीत म्हणत बालगृहातील मुलींची शहरभर धाव

या घटनेची दखल घेत बालकल्याण समितीने तात्काळ हस्तक्षेप केला. रात्री उशिरा नऊपैकी सात मुली समितीसमोर हजर करण्यात आल्या. चौकशीनंतर चार मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले, तर तीन मुलींना इतर सुरक्षित बालगृहात हलवण्यात आले. मात्र दोन मुली अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालगृहाची मान्यता तात्काळ रद्द केली असून औरंगाबाद खंडपीठास राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. बुधवारी दुपारी आरोपी महिलांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सत्र न्यायालयाने यापैकी तिघींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा: विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 78 लाखांची फसवणूक

हेही वाचा: धक्कदायक! टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला शाळेच्या व्यवस्थापनाकडून बेदम मारहाण

या घटनेमुळे संपूर्ण बालगृह व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक संघटनांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.


सम्बन्धित सामग्री