लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या स्कूल व्हॅन चालकाने तिच्यावर डिजिटल पद्धतीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणात आरोपी चालक मोहम्मद आरिफला अटक करण्यात आली असून, शाळेच्या व्यवस्थापनाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिजिटल बलात्कार म्हणजे काय? जाणून घेऊयात.
पीडित मुलीच्या आईने सांगितले की, शाळेच्या व्हॅनमधून मुलगी दररोज शाळेत जात होती. काही दिवसांपूर्वी मुलीने गुप्तांगात वेदना होत असल्याची तक्रार केली. वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरावर लैंगिक अत्याचाराचे स्पष्ट पुरावे आढळले. डॉक्टरांनी सांगितले की तिच्या गुप्तांगात काहीतरी घालण्यात आले आहे. मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, शाळेने तक्रार न करण्याचा सल्ला दिला आणि म्हणाले की, यामुळे शाळेची प्रतिष्ठा आणि मुलीचे भविष्य धोक्यात येईल. एवढेच नव्हे, तर तक्रार मागे घेण्यासाठी ड्रायव्हरने धमकी दिल्याचा गंभीर आरोपही पीडितेच्या आईने केला आहे.
डिजिटल बलात्कार म्हणजे काय?
'डिजिटल बलात्कार' म्हणजे बोट किंवा इतर कोणतेही अवयव/वस्तू पीडितेच्या संमतीशिवाय गुप्तांगात घालणे. 'डिजिटल' हा शब्द इथे बोटांचा (digits) संदर्भ देतो. हे कृत्य भारतीय कायद्यानुसार बलात्कार म्हणूनच ओळखले जाते आणि यासाठी POCSO कायदा अंतर्गत कडक शिक्षेची तरतूद आहे. जगभरातील वैद्यकीय व्यावसायिक आणि मानवाधिकार संघटना डिजिटल बलात्काराला शारीरिक स्वायत्तता आणि मानवी प्रतिष्ठेचे गंभीर उल्लंघन मानतात.
हेही वाचा - तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची चौकशी करा; महिला व बालकल्याण समितीची शिफारस
आरोपीला अटक
दरम्यान, डीसीपी (पूर्व) शशांक सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपी चालक मोहम्मद आरिफला अटक करण्यात आली आहे. अधिकृत प्रेस रिलीजनुसार, व्हॅन चालक मोहम्मद आरिफ आणि किडझी स्कूलचे व्यवस्थापक संदीप कुमार यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम 5 (एम)/6 आणि एससी/एसटी कायद्याच्या कलम 3 (2) (व्ही) आणि 3 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - गळ्यावर चटके अन् अमानुष मारहाण; सावत्र बापाने केला मुलीवर अत्याचार
तथापी, तक्रारदाराने शाळा व्यवस्थापनाविरुद्धही तक्रार केली होती. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू असून तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. या घटनेने पुन्हा एकदा बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. शाळा व्यवस्थापनाने असंवेदनशीलतेने वागल्याचा आरोप झाल्याने शिक्षण संस्थांवरील विश्वासाला तडा गेला आहे.