Sunday, August 31, 2025 05:29:02 PM

Latur Crime: विवाहबाह्य संबंधात अडसर, पत्नीला जिवंत जाळलं; महिन्याभरानंतरही आरोपीला पकडण्यात पोलीस अपयशी

प्रेयसीसोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीला पतीने त्याची प्रेयसी व नातेवाईकांच्या मदतीने पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक प्रकार समोर आला.

latur crime विवाहबाह्य संबंधात अडसर पत्नीला जिवंत जाळलं महिन्याभरानंतरही आरोपीला पकडण्यात पोलीस अपयशी

अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर: प्रेयसीसोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीला पतीने त्याची प्रेयसी व नातेवाईकांच्या मदतीने पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक प्रकार समोर आला. लातूरच्या रेणापूर तालुक्यातील पानगाव ही घटना घडली आहे. घटनेला तब्बल एक महिना उलटला तरी आरोपी पतीला मदत करणारे आरोपी रेणापूर पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

लातूर तालुक्यातील बोरी येथील फातिमा कुरेशी नामक तरुणीचे रेणापूर तालुक्यातील पानगावमधील तौफिक कुरेशी नावाच्या तरुणाशी तीन वर्षांपूर्वी विवाह झाला. परंतु तौफिकचे त्याची प्रेयसी हिना पठाण हिच्याशी असलेले अनैतिक संबंध सर्वपरिचित होते. हीना ही विवाहित असली तरी ती तौफिक सोबतच राहते. त्यातून मयत फातिमा व तौफिक  यांच्यात अनेकदा टोकाचे वाद झाले. त्यातून 24 जुलै रोजी रात्री फातिमा यांच्यावर पती तौफिक कुरेशी याने पेट्रोल ओतले तर त्याची प्रेयसी हिना पठाण हिने माचीसची काडी पेटवून फातिमाच्या अंगावर टाकली आणि फातिमाला बचाव करता येऊ नये म्हणून सासू फैमून कुरेशी, दीर शफिक कुरेशी याने घराचा दरवाजा बाहेरून बंद करून केला. जखमी फातीमाला लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु सहा दिवसानंतर फातिमाची मृत्यूची सुरू असलेली झुंज अखेर संपली अन् उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयत फातीमाला दोन वर्षाची एक चिमुकली मुलगी आहे.  

हेही वाचा: Virar Building Collapse: चिमुकलीच्या पहिल्या वाढदिवसाचा केप कापला अन् इमारत कोसळली; विरारमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू

या गुन्ह्यातील आरोपी फातिमाचा पती तौफिक कुरेशी याला रेणापूर पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली. परंतु घटनेला तब्बल एक महिना उलटला तरी आरोपी हिना पठाण, सासू फैमून कुरेशी, दीर शफिक कुरेशी यांना पकडण्यात रेणापूर पोलिसांना यश आले नसल्याने पोलिसांच्या  कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असून मयत फातिमाचे नातेवाईक व बोरीच्या गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात फातिमाच्या न्यायासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


सम्बन्धित सामग्री