बीड: बीडमध्ये असलेल्या शिरूर तालुक्यातील घाटशीळ - पारगाव परिसरात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. काही लोकांनी जुन्या वादातून एका तरुणाच्या आणि त्याच्या आईचे अपहरण केले आणि त्यानंतर दोघा मायलेकाला अमानुष मारहाण केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी कृष्णा दादासाहेब घोडके आणि त्यांच्या आईचे अपहरण केले. त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तींनी त्यांना एका ठिकाणी नेले आणि त्यांची बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे पीडित कृष्णा घोडके यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार आहेत, त्यामुळे ही बाब चिंताजनक ठरत आहे.
जुन्या वादामुळे क्रूरतेची हद्द पार:
जुन्या वादामुळे ही धक्कादायक घटना घडली आहे, असं फिर्यादीमध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे. आधी अपहरण केले आणि त्यानंतर क्रूरतेची हद्द पार करून आरोपींनी पीडित मायलेकावर अमानुषपणे मारहाण केली. या घटनेमुळे पीडित कुटुंबीय खूपच हादरले. या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिले आणि आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. 'आमच्या कुटुंबावर अन्याय झाला आहे. दोषींना त्वरित अटक करा आणि त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे', अशी भावना पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केली.
पोलिसांनी घेतली या घटनेची गंभीर दखल:
या घटनेवर पोलीसांनी गंभीर दखल घेतली असून 'तपास सुरू आहे' असे सांगितले जात आहे. मात्र, दुर्दैवाने आरोपी अजूनही फरार आहेत, त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी अधिक प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.