मुंबई: लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओत एक वृद्ध जोडपे शेतात नांगरणी करताना दिसत होते. एकीकडे पती नांगर ओढत होता तर दुसरीकडे पत्नी नांगर सांभाळत होती. हे दृश्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. या वृद्ध जोडप्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने शेती नांगरण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे, ते स्वतःच हे काम करत असे.
सोनू सूदने दिला मदतीचा हात
वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूदने या शेतकरी दाम्पत्याच्या मदतीसाठी पुढाकार घेत त्याने थेट प्रतिक्रिया दिली की, 'तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो'. वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासनही सक्रिय झाले आणि मदतीसाठी या वृद्ध दाम्पत्याकडे पोहोचले.
7 जुलै रोजी, अभिनेता सोनू सूदने सायंकाळी 7 वाजता एक्सवर पोस्ट करत वृद्ध दाम्पत्यांना आर्थिक मदत केल्याची माहिती दिली. सोनू सूद म्हणाले की, 'मी आपल्या शेतकरी अंबादास दादांना शक्य तितकी मदत केली आहे. आता तुम्हीही तुमच्या वाट्याचे गवत पाठवा. तुम्हाला माहिती आहे भाऊ, ट्विटरवर विष पसरवून देश चालणार नाही. जर तुम्हाला दुसऱ्याला मदत करायची असेल तर मेसेज पाठवा. जय हिंद'.
दाम्पत्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट
पवार दाम्पत्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची माहिती समोर आली आहे. 75 वर्षांच्या या वृद्ध शेतकरी जोडप्यांची आर्थिक अडचणींमुळे शेतीची नांगरणी करण्यासाठी कोणतेही साधन घेण्यास अशक्य होते. त्यामुळे ते स्वतःच नांगर ओढत शेतकाम करत होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि सरकार जागे झाले.