Sunday, August 31, 2025 04:51:03 PM

Sidhu Moosewala Murder: सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा खुलासा; आरोपी गोल्डी बरारचा खळबळजनक कबुलीजबाब

सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी गोल्डी बरारने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक खुलासे केले असून, हत्या अहंकार आणि जुने वाद यामुळेच झाली असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

sidhu moosewala murder सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा खुलासा आरोपी गोल्डी बरारचा खळबळजनक कबुलीजबाब

Sidhu Moosewala Murder: पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या निर्घृण हत्येनंतर तब्बल तीन वर्षांनंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गँगस्टर गोल्डी बरारने खळबळजनक खुलासा केला आहे. बीबीसीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत गोल्डीने सांगितले की मूसेवाला यांना त्यांच्या 'अहंकारामुळे आणि क्षमायोग्य नसलेल्या चुकांमुळे' मारले गेले.

29 मे 2022 रोजी मानसा जिल्ह्यातील आपल्या गावाजवळ मूसेवाला स्वतःच्या गाडीने जात असताना त्यांच्यावर तब्बल 100 पेक्षा अधिक गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती.

हेही वाचा: Gold Price: सोन्याने तोडले सर्व रेकॉर्ड; किंमत दररोज नव्या शिखरावर

गोल्डी बरारने स्पष्ट केले की लॉरेंस बिश्नोई आणि सिद्धू मूसेवाला यांच्यात एकेकाळी संवाद होता. त्याने दावा केला की मूसेवाला बिश्नोईची चापलुसी करत ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘गुड नाईट’ मेसेज पाठवत असे. मात्र एक कबड्डी स्पर्धा हे दोघांमध्ये मतभेदाचे कारण ठरले. मूसेवाला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना समर्थन देत होता, हे बघून बिश्नोई आणि त्याच्या टोळीतील सदस्य चिडले.

गोल्डी बरार म्हणाला, 'आम्ही पोलिसांकडे आणि यंत्रणांकडे न्यायासाठी गेलो होतो, पण कोणीही आमचं ऐकलं नाही. म्हणून आम्ही न्याय स्वतःच घेतला. जेव्हा शालीनतेने ऐकलं जात नाही, तेव्हा गोळीचं उत्तर ऐकवलं जातं.'या प्रकरणावर त्याला कोणताही पश्चात्ताप नाही, असंही गोल्डीने स्पष्टपणे सांगितलं. त्याच्या मते, मूसेवालाने राजकीय ताकद, पैसा आणि संसाधनांचा गैरवापर करून त्यांच्या विरोधकांना मदत केली होती आणि त्यामुळे तो ‘टार्गेट’ झाला.

हेही वाचा: 'फडणवीसांना वाटतं ते सगळ्यांना नाचवू शकतात'; संजय राऊतांची फडणवीसांवर जहरी टीका

गोल्डी बरार सध्या कॅनडामधून सक्रिय असून त्याच्यावर UAPA अंतर्गत आतंकवादी म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्याच्यावर इंटरपोलने रेड कॉर्नर नोटिस जारी केली आहे आणि त्याच्या अटकेसाठी भारतात अजामिनपात्र वॉरंटही जारी आहे. बरारवर पंजाबमध्ये शस्त्रांची तस्करी, टार्गेट किलिंग, दहशतवादी भरती आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलसारख्या बंदी घातलेल्या संघटनांसोबत संबंध असल्याचा आरोप आहे.

सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येने संपूर्ण पंजाब आणि देश शोकसागरात बुडाला होता. आता या खुनामागची पार्श्वभूमी स्वत: आरोपीने उघड केली असून, कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


सम्बन्धित सामग्री