Neena Gupta Affair with Vivian Richards : 80 च्या दशकातील प्रतिभावान अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू विव्हियन रिचर्ड्स यांचं प्रेमप्रकरण नेहमीच चर्चेत राहीलं. यापेक्षाही जास्त चर्चेत राहिली ती नीनाने एकटीने मुलगी मसाबाचं पालनपोषण केलं, ही बाब. विव्हियन सोबतच्या प्रेमप्रकरणामुळे नीनाला सुरुवातीला खूप छान वाटलं.. अगदी आभाळच ठेंगणं झाल्यासारखं वाटलं.. पण जेव्हा एकेरी पालकत्वाची वेळ आली, तेव्हा ते सोपं नव्हतं, असं नीनाने अनेकदा मुलाखतींमधून सांगितलंय.
चित्रपट आणि टेलिव्हिजन अशा दोन्हीही क्षेत्रात सहजसुंदर अभिनय करणारी अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता प्रसिद्ध होती. 80 च्या दशकात अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या प्रतिभावान नीनाने अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या. पण तिचं खासगी आयुष्य मात्र तिच्या अभिनयाइतकंच चर्चेत राहिलं. क्रिकेट जगतातील दिग्गज, वेस्ट इंडिजचा फलंदाज विवियन रिचर्ड्ससोबतचं तिचं प्रेमप्रकरण आणि त्यातून झालेलं मातृत्व यामुळे तिचं नाव त्याकाळी खूपच चर्चेत होतं.
हेही वाचा - 'मला ते अश्रू आठवत राहतील, जे तू...' किंग कोहलीच्या निवृत्तीवर पत्नी अनुष्काची भावनिक पोस्ट
त्या काळात, विवियन रिचर्ड्स भारत दौऱ्यावर आला होता. याच दरम्यान नीनाची त्याच्याशी ओळख झाली आणि हळूहळू एक सुंदर मैत्री प्रेमात बदलली. पण त्यांच्या या नात्याचं एक वेगळंच वळण तेव्हा आलं, जेव्हा नीनाला कळलं की ती लग्नाआधीच आई होणार आहे! विव्हियन आधीच विवाहित होता. त्याचं नीनावर खूप प्रेम होतं; मात्र, त्यानं पत्नीला घटस्फोट देऊन नीनाशी लग्न कधीच केलं नाही, असं नीना यांनी अनेकदा सांगितलंय.
नवीन चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागणं हा विवाहित स्त्रीच्या जीवनातील अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण असतो. मात्र, अशी चाहूल अविवाहित स्त्रीसाठी तितकीच धास्तावणारी बाब असते. त्यातच तो काळ तर, आणखी जुना.. पण ही बातमी नीनासाठी आनंददायी तर होतीच, शिवाय, विव्हियनही यामुळे आनंदित झाला.
खरं तर, त्या काळात भारतीय समाजात लग्नाआधी गरोदर होणं हे समाजात सहजपणे स्वीकारलं जाणारं नव्हतं. नीनाने एका मुलाखतीत सांगितलं की, “मी खूप टेन्शनमध्ये होते. पण मनात कुठेतरी आनंदही होता. कारण मी विवियनवर खूप प्रेम करत होते.”
जेव्हा नीनाने विव्हियनला ती त्याच्या बाळाची आई होणार असल्याबद्दल सांगितलं, तेव्हा त्यानेही अपेक्षेपेक्षा वेगळीच प्रतिक्रिया दिली. “त्याने मला स्पष्ट सांगितलं की गर्भपाताचा विचारही करू नकोस. तो माझ्या निर्णयासोबत असेल,” असं नीनाने सांगितलं.
मात्र, विवियन रिचर्ड्स आपल्या देशात परत गेला आणि त्याने नीनाशी लग्न केलं नाही. त्याने त्याच्या पत्नीला घटस्फोटही दिला नाही. तरीही, नीना आणि विव्ह यांचा संपर्क तुटला नाही. तिला सुरुवातीला विव्हियनसोबत लग्न व्हावं, असं खूप वाटत होतं. पण आपली इच्छा पूर्ण होणार नाही, हे जाणवल्यानंतर तिने सत्य स्वीकारलं. तिने कोणाच्याही आधाराविना आपली मुलगी मसाबा हिचं पालनपोषण केलं. एकटीने, आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे.
काहींनी तिला विचारलं, “इतक्या कमी वयात आई होऊन तू हे सर्व कसं हाताळशील?” पण नीनाला त्यावेळी प्रेमात आंधळं झाल्यासारखं वाटत होतं. तिच्यासाठी तो फक्त एक निर्णय नव्हता - ती एक जिद्द होती, स्वतःवर ठेवलेली श्रद्धा होती.
हेही वाचा - 'मी खांबामागे..' पत्नी ताहिराला कर्करोग झाल्याचं कळताच ‘अशी’ झाली होती आयुष्मान खुरानाची स्थिती
आज नीना गुप्ता आणि मसाबा गुप्ता - आई आणि मुलगी - दोघीही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. त्यांच्या या संघर्षमय प्रवासातून अनेकांना प्रेरणा मिळते. नीनाने जसं त्या काळात समाजाच्या विरोधात जाऊन, स्वतःच्या मतावर ठाम राहून मातृत्व स्वीकारलं, त्यासाठी तिचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. विव्हियन रिचर्डस् यांनाही आपल्या मुलीचं खूप कौतुक आहे. त्यांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर येत असतात आणि त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे.