Jyoti Chandekar: मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि मालिकांमध्ये जवळपास पाच दशकं अविस्मरणीय ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्यानं मनोरंजन विश्व शोकाकुल झालं आहे. पुण्यात उपचार सुरू असताना 16 ऑगस्ट 2025 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 69व्या वर्षी आलेल्या या निधनामुळे प्रेक्षकांनी आपली ‘पूर्णा आजी’ कायमची गमावली.
ज्योती चांदेकर यांचा अभिनय प्रवास विलक्षण होता. बालवयातच नाटकांतून त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला आणि तेव्हापासूनच त्यांचं करियर तेजीत झेपावलं. वयाच्या केवळ 16व्या वर्षी त्यांनी हिंदी चित्रपट ‘एक नजर’ मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. पुढे मराठी रंगभूमीवर 'सुंदर मी होणार’, ‘आमदार सौभाग्यवती’, ‘वऱ्हाडी माणसं’, ‘राजकारण गेलं चुलीत’ अशा गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी जबरदस्त लोकप्रियता मिळवली.चित्रपटसृष्टीत ‘ढोलकी’, ‘मी सिंधूताई सकपाळ’, ‘बिंधास्त’, ‘श्यामची आई’, ‘सांजपर्व’ अशा चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. प्रत्येक भूमिकेत त्यांनी भावनिक छटा सहजतेने दाखवल्या आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात त्यांचं खास स्थान निर्माण झालं.
हेही वाचा: Jyoti Chandekar: मराठी रंगभूमीला मोठा धक्का! तेजस्विनी पंडितच्या आई व ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन
दूरदर्शन आणि मालिकांमधून त्यांनी नवी ओळख निर्माण केली. ‘तू सौभाग्यवती हो’ आणि ‘छत्रीवाली’ या मालिकांनंतर त्यांचा सर्वाधिक चर्चेत असलेला रोल होता ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजी. जवळपास अडीच वर्षांहून अधिक काळ त्यांनी ही भूमिका साकारली आणि प्रत्येक घराघरात त्या प्रेमळ आजी म्हणून पोहोचल्या. त्यांच्या जाण्याने या मालिकेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या निधनानंतर 17 ऑगस्ट रोजी पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलगी तेजस्विनी पंडित हिने आईचे सर्व विधी पार पाडत आपलं लेकीचं कर्तव्य निभावलं. आईला निरोप देताना तिच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आलं.
या प्रसंगी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. श्रेया बुगडे, धैर्य घोलप, सुचित्रा बांदेकर, श्रुती मराठे, जुई गडकरी यांच्यासह असंख्य सहकारी कलाकार उपस्थित होते. इतकंच नव्हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपस्थित राहून आदरांजली वाहिली.
ज्योती चांदेकर यांनी आपल्या आयुष्यातील शेवटच्या दिवसापर्यंत अभिनय केला. नुकतेच त्यांनी ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या विशेष भागाचे शूटिंग पूर्ण केले होते. त्यामुळे त्यांचे अचानक जाणे हा मोठा धक्का आहे.
ज्योती चांदेकर यांच्या जाण्याने मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी या सर्वच क्षेत्रांनी एक प्रेमळ, आपुलकीनं वागणारी आणि अभिनयात समर्पण असलेली कलाकार गमावली आहे. प्रेक्षकांच्या मनात मात्र त्यांची पूर्णा आजी म्हणून कायमची आठवण राहील.