मुंबई : होळीच्या रंगात रंगून गेलेला सारा देश सणाचा आनंद लुटत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण या उत्सवाचा जल्लोष साजरा करत आहेत. लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिकेनेही आपल्या कुटुंबासोबत होळीचा आनंद घेतला. मात्र, यंदाच्या होळीमध्ये त्याची पत्नी लक्षवेधी ठरली आहे.
कुशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पत्नीचा एक रोमांचक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कुशलची पत्नी पेटत्या होळीतून जळता नारळ बाहेर काढताना दिसते. हा थरारक प्रकार पाहून कुशलने आश्चर्य व्यक्त करत म्हटलं, “वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है!” हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांनीही यावर कौतुकाच्या कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा: होळीचा रंग, सुरक्षिततेचा संग; नो बॅड टच बॅनरने वेधले मुंबईकरांचे लक्ष!
कोकणात होळीतून नारळ काढण्याची परंपरा आहे. ही परंपरा निभावत कुशलच्या पत्नीने दाखवलेल्या धाडसाची जोरदार चर्चा रंगली आहे. कुशलने आपल्या विनोदी शैलीत या प्रसंगावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आणि चाहत्यांचे मनोरंजन केले.
मराठी मनोरंजनसृष्टीत कुशल बद्रिके हे नाव मोठ्या लोकप्रियतेने परिचित आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. चित्रपट, मालिका आणि स्टेज शोमधून कुशलने आपली बहुपेडी अभिनय क्षमता सिद्ध केली आहे. सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रिय असून चाहत्यांना आपल्या खास क्षणांमध्ये सामील करून घेत असतो.