त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नियोजित सांस्कृतिक कार्यक्रमावर पुरातत्व विभागाने आक्षेप घेतला आहे. या संदर्भात त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र पाठवून विभागाने नियमबाह्य कार्यक्रम रोखण्याचे आदेश दिले आहेत.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर परिसरात कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी दिल्ली येथील पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक आहे. मात्र, हा कार्यक्रम विनापरवानगी आयोजित केला जात असल्याने पुरातत्व विभागाने आक्षेप नोंदवला आहे.
हेही वाचा : दृश्यम ३ चा ट्रेलर रिलिज. 'हा' अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत
माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनीही या कार्यक्रमाविरोधात आक्षेप घेतला होता. मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर पुरातत्व विभागाने तातडीने दखल घेतली आणि देवस्थान ट्रस्टला सुधारात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
व्हीआयपी दर्शन शुल्कावरही आक्षेप
पुरातत्व विभागाने फक्त सांस्कृतिक कार्यक्रमांवरच नाही, तर व्हीआयपी दर्शनासाठी उत्तरेकडील गेटवर आकारण्यात येणाऱ्या २०० रुपयांच्या शुल्कावरही आक्षेप घेतला आहे. असा प्रवेश शुल्क आकारणे एएमएएसआर कायद्याचे उल्लंघन असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : घटस्फोटानंतर क्रिकेटपटू युजवेंद्र देणार धनश्रीला 'इतकी' पोटगी. वाचून व्हाल थक्क
देवस्थान ट्रस्टची पुढील भूमिका काय?
पुरातत्व विभागाच्या या आदेशानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट पुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रम पुढे होणार की नाही, याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.