Wednesday, August 20, 2025 04:33:07 AM

Coolie Movie: थलायवा फीव्हर! Coolie साठी एका तिकिटावर चाहत्यांनी केली हजारोंची उधळण, किंमत ऐकून थक्क व्हाल

रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाने बेंगळुरूमध्ये विक्रमी तिकीट दर गाठले. फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी 4500 रुपये पर्यंत दर, सोशल मीडियावर चर्चा, सरकारी नियमनाची मागणी.

 coolie movie थलायवा फीव्हर  coolie साठी एका तिकिटावर चाहत्यांनी केली हजारोंची उधळण किंमत ऐकून थक्क व्हाल

 Coolie Movie: रजनीकांतच्या चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो, पण यावेळी त्याच्या आगामी ‘कुली’ चित्रपटाने अपेक्षेपेक्षाही मोठा गाजावाजा निर्माण केला आहे. बेंगळूरुमध्ये या चित्रपटाच्या तिकिटांच्या किंमतींनी अक्षरशः विक्रमी उच्चांक गाठला असून, फर्स्ट डे फर्स्ट शोचं तिकीट तब्बल 4500 रुपये पर्यंत पोहोचल्याने चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

शनिवार, 9 ऑगस्ट 2025 रोजी या चित्रपटाचं आगाऊ बुकिंग सुरू झालं आणि केवळ 30 मिनिटांत 66 शोसाठी सुमारे 10,000 रुपये तिकिटांची विक्री झाली. पहाटेच्या आणि सकाळच्या शोसाठी विशेष मागणी असल्याने अनेक थिएटर्सनी तिकीट दर गगनाला भिडवले. एम.जी. रोडवरील ‘स्वागत शंकर नाग’ थिएटरमध्ये गोल्ड रिक्लाइनर सीटसाठी कमाल दर 2,000 रुपये तर इतर गोल्ड सीट 1,500 रुपये आणि सिल्व्हर-लाउंज सीट 1,000 रुपये मध्ये विकल्या गेल्या.

तवरेकेरे येथील लक्ष्मी सिनेमामध्ये डायमंड क्लास 1,000 रुपये आणि गोल्ड क्लास 800 रुपये मध्ये उपलब्ध होते. संपूर्ण बेंगळूरुमध्ये साधारण पहाटेच्या शोची सरासरी किंमत 400-500 रुपये होती, परंतु काही ठिकाणी हा दर 1,000 रुपये पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतक्या मोठ्या किंमतींवर चाहत्यांकडून आणि सोशल मीडियावरून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कारण, तामिळनाडूमध्ये जो रजनीकांतचा बालेकिल्ला मानला जातो तिथल्या चेन्नईतील मोठ्या मल्टीप्लेक्स ‘मायाजाळ’मध्ये देखील तिकिट दर 200 रुपये  पेक्षा जास्त नाही.

राज्य सरकारनं यापूर्वी अर्थसंकल्प 2025-26 मध्ये सर्व थिएटर्स आणि मल्टीप्लेक्समध्ये तिकिट दर 200 रुपये पर्यंत मर्यादित करण्याची घोषणा केली होती. 14 जुलै रोजी सरकारनं या नियमाचा प्रभाव पडणाऱ्या सर्व संबंधितांना 15 दिवसांची नोटीस दिली होती. मात्र, आजतागायत या संदर्भात कोणताही ठोस निर्णय किंवा अंमलबजावणी झालेली नाही.

याच पार्श्वभूमीवर, 'कुली'च्या बुकिंगदरम्यान आकारण्यात आलेल्या वाढीव दरांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चित्रपट वितरक व थिएटर मालक यांचं म्हणणं आहे की, पहाटेच्या शो, विशेष रिक्लाइनर सीट्स आणि पहिल्या दिवसाची मागणी यामुळे दर जास्त ठेवले जातात. मात्र, प्रेक्षकांच्या दृष्टीने हे दर परवडणारे नाहीत आणि त्यामुळे सरकारी नियमनाची गरज भासते.

15 ऑगस्ट 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणारा ‘कुली’ हा रजनीकांतच्या कारकिर्दीतील आणखी एक भव्य चित्रपट ठरण्याची चिन्हं आहेत. तिकीट दरावरील वाद, सोशल मीडियावरील चर्चा आणि बुकिंगचे विक्रम यामुळे हा चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.


सम्बन्धित सामग्री