बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या अगदी आधी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बंगळुरूच्या बाहेरील एका तलावातून 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी सांगितले की, आर. सहाना असे मृत तरुणीचे नाव आहे. ती होसूरजवळील हरोहल्लीची रहिवासी होती. पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी हा अपघात असल्याचा दावा केला आहे. तर, मुलीच्या मित्राने असा आरोप केला आहे की, सहानाची हत्या खोट्या कौटुंबिक, सामाजिक अभिमानासाठी करण्यात आली आहे. कारण तिचे वडील त्यांच्या नात्याविरुद्ध होते. कारण ते दोघेही वेगवेगळ्या समुदायाचे होते.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे वडील राममूर्ती यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी दुचाकी चालवत असताना त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे, ते आणि त्यांच्या मागे बसलेली त्यांची मुलगी हेब्बागोडी येथील एका तलावात पडले. वडिलांना पोहता येत असल्याने ते अपघातातून वाचले. परंतु, त्यांच्या मुलीला पोहता येत नसल्याने ती बुडाली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. यानंतर, मुलीच्या वडिलांनी तत्काळ पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची तक्रार दाखल केली.
हेही वाचा - Kerala Ragging Case: केरळमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसोबत रॅगिंगचा भयानक प्रकार, गुप्तांगाला डंबेल्स… अमानुष छळ
ऑनर किलिंगचा आरोप (Honour Killing In Bengaluru?)
पोलिसांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच सहानाचा मित्र नितीन याने आरोप केला की हे 'ऑनर किलिंग'चे प्रकरण आहे. प्रियकराचा असा दावा आहे की, राममूर्ती (मुलीचे वडील) यांनी त्यांच्या नात्याला विरोध केला होता. नितीन आणि सहाना वेगवेगळ्या समुदायातील असल्याने त्यांना या दोघांचा एकमेकांशी विवाह होणे मंजूर नव्हते. या कारणाने वडील राममूर्ती यांनी आपल्या मुलीला जाणूनबुजून तलावात ढकलले असावे. नितीनने पोलिसांना सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी त्याला रविवारी रात्री हेब्बागोडी येथील त्यांच्या मित्राच्या घरी बोलावले. त्याच्या उपस्थितीत सहानाला तिच्या वडिलांनी मारहाण केली, अशी माहिती नितीनने दिली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. असे असूनही, सहाना त्याच्याशी लग्न करण्याच्या तिच्या निर्णयावर ठाम होती.
हेही वाचा - ‘बाबा मलाही पेटवून देतील’... चिमुकल्याचं अंगावर काटा आणणारं बोलणं, गंभीर गुन्हा उघडकीस
पोलिसांनी काय म्हटले?
पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान, पीडितेच्या वडिलांनी कबूल केले की, त्यांच्या मुलीच्या नात्याबद्दल कळल्यानंतर ते नाराज झाले होते. मात्र, अपघात होण्याआधी गाडी चालवताना त्यांना झोप येत असल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले होते. यानंतर अपघात झाला असे ते म्हणाले. मुलीच्या वडिलांनी दावा केला की, त्यांना पोहायला येत होते. पण ते त्यांच्या मुलीला वाचवू शकले नाहीत. पोलिसांनी सांगितले की, आम्ही निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात होता की ऑनर किलिंगचे प्रकरण होते, हे शोधण्यासाठी सर्व आरोपांची चौकशी केली जात आहे.