लडाख: लडाखच्या अत्यंत संवेदनशील दुरबुक भागातून मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळी सुमारे 11:30 वाजता भारतीय लष्कराच्या एका वाहनावर अचानक मोठा दगड कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक अधिकारी आणि दोन जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातात एक अधिकारी आणि दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरून मोठे दगड खाली कोसळले आणि थेट लष्कराच्या वाहनावर आदळले. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य तत्काळ सुरू करण्यात आले आहे. तसेच जखमींना तातडीने जवळच्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हेही वाचा - पूंछमध्ये सुरक्षा दलाची कारवाई; 2 दहशतवाद्यांना कंठस्नान
गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये वातावरण प्रतिकूल आहे. सततच्या पावसामुळे आणि बर्फवृष्टीमुळे रस्ते अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी अशाच एका घटनेत दोन लोक जखमी झाले होते, ज्यांना लष्कराच्या अग्निशमन दलाने वेळेवर वाचवले.
हेही वाचा - मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित; बालटाल व पहलगाम मार्ग बंद
सुरक्षा दलांकडून सातत्याने दक्षता -
दरम्यान, लडाखसारख्या उच्च पर्वतीय आणि धोकादायक भागात लष्कर सतत कार्यरत आहे. अशा घटनांमुळे जवानांची धाडसी सेवा अधिक अधोरेखित होते. याचबरोबर ही घटना शासन आणि लष्कर प्रशासनासाठी एक गंभीर इशारा आहे. खराब हवामानात वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित पद्धतींची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.