Vice President Election 2025: इंडिया ब्लॉकचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती (निवृत्त) बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी उपराष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेते त्यांच्या सोबत उपस्थित होते. रेड्डी हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असून तामिळनाडू भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जातात. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार, द्रमुकसह इतर अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते.
80 खासदारांचा पाठिंबा -
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध पक्षांच्या 80 खासदारांनी बी. सुदर्शन रेड्डी यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ नामांकनपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर रेड्डी यांनी निवेदन जारी करून सर्वांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून त्यांच्या अनुभवाचा उल्लेख करताना रेड्डी यांनी सांगितले की, भारताची खरी ताकद म्हणजे प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा, संवैधानिक नैतिकता आणि विविधतेतील एकता.
हेही वाचा - CJI B R Gavai : निवडून आलेले सरकार राज्यपालांच्या मर्जीवर अवलंबून राहावे का? राष्ट्रपतींच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर
रेड्डी यांनी आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वर्णन ‘दोन व्यक्तींमधील स्पर्धेपेक्षा खूप मोठे’ असे केले. त्यांच्या मते, ही निवडणूक संविधान निर्मात्यांनी कल्पना केलेल्या भारताच्या तत्त्वांना बळकटी देण्याबद्दल आहे. जिथे संसद प्रामाणिकपणे काम करते, मतभेदांचा आदर होतो आणि संस्था स्वातंत्र्य व निष्पक्षतेने लोकांची सेवा करतात.
हेही वाचा - Vice President Election 2025: कोण होणार उपराष्ट्रपती?, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते? जाणून घ्या..
रेड्डी यांनी म्हटलं आहे कीस 'जर मी निवडून आलो, तर राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून माझी भूमिका निष्पक्षतेने, सन्मानाने आणि संवाद व सौजन्याच्या दृढ वचनबद्धतेने पार पाडेन. त्यांनी इंडिया ब्लॉककडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले व 'ही लढाई न्याय, समानता आणि एकतेसाठी आहे. आपल्या संविधानावर विश्वास ठेवून मी या प्रवासाला सुरुवात करत आहे,' असं म्हटलं आहे.