शुभम उमाळे. प्रतिनिधी. मुंबई: केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात 9 जुलै रोजी देशभरातील 25 कोटी कामगार भाग घेणार असल्याची माहिती आहे. बुधवारी, देशभरात निषेध प्रदर्शन होणार आहे. यात बँकिंग, खाणकाम, पोस्टल सर्व्हिस, बांधकाम आणि इतर क्षेत्रातील कामगार या बंदमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे देशातील प्रमुख सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील 10 प्रमुख कामगार संघटनांनी या भारत बंदची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने कामगार विरोधी, शेतकरी विरोधी धोरण अवलंबल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. सरकारच्या या धोरणांचा फायदा केवळ उद्योगपतींना, त्यांच्या उद्योगांना होणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.
भारत बंदमध्ये कोणत्या सेवा बंद राहतील?
बँकिंग सेवा
विमा कंपन्यांचे काम
पोस्ट ऑफिस
कोळसा खाणींचे काम
राज्य वाहतूक सेवा (सरकारी बसेस)
महामार्ग आणि रस्ते बांधकाम
हेही वाचा: निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी संजय गायकवाडांनी केला कॅन्टीनमध्येच राडा
कोणत्या सेवा सुरू राहतील?
बहुतेक खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे काम सुरू असतील
रुग्णालय आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा सामान्य राहण्याची अपेक्षा आहे
खाजगी शाळा/महाविद्यालये आणि ऑनलाइन सेवा सुरू असतील
'9 जुलै रोजी होणाऱ्या बंदमध्ये देशातील शहरी भागांसह ग्रामीण भागांतील कामगारही सहभागी होणार', अशी माहिती कामगार संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे. देशव्यापी संपादरम्यान अनेक अत्यावश्यक सेवा बंद राहण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर होण्याची शक्यता आहे.
भारत बंद का पुकारण्यात आला?
'कामगार संघटनांनी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे 17 प्रमुख मागण्या मान्य करण्याची मागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे, कामगार संघटनांनी 9 जुलै रोजी भारत बंदची हाक देण्यात आली', अशी माहिती कामगार संघटनांनी दिली.