दिल्ली: बुधवारी, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. 13 मे 2025 रोजी, विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या शिफारशीवरून न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भूषण गवई यांचा शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनात पार पडला. तसेच, भूषण गवई यांचा कार्यकाळ 14 मे 2025 पासून 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे.
हेही वाचा: शासन धोरण येईपर्यंत देवस्थान जमिनींचे व्यवहार थांबवा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे नोंदणी विभागास निर्देश
कोण आहेत भूषण गवई?
भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये झाला. अमरावतीमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. 16 मार्च 1985 रोजी भूषण गवई यांनी वकिली म्हणून काम करण्यास सुरूवात केली. 1987 ते 1990 या कालावधीत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकालत केली, त्यानंतर त्यांनी नागपूर खंडपीठात काम केले. तसेच, 1992 ते 1993 मध्ये नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त लोक अभियोक्ता म्हणून भूषण गवई कार्यरत होते. 17 जानेवारी 2000 रोजी नागपूर खंडपीठासाठी सरकारी वकील आणि लोक अभियोक्ता म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती झाली. त्यानंतर, 14 नोव्हेंबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली आणि 12 नोव्हेंबर 2005 रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले.