Uttarakhand Avalanche Update
Edited Image
Uttarakhand Avalanche Update: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथजवळील माना गावात सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) छावणीवर झालेल्या हिमस्खलनामुळे बेपत्ता झालेल्या चारही कामगारांचे मृतदेह रविवारी सापडले. ज्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 8 वर पोहोचली आहे. संरक्षण जनसंपर्क अधिकारी मनीष श्रीवास्तव यांनी सांगितले की, शेवटच्या बेपत्ता कामगाराचा मृतदेहही सापडला असून माना गावात हिमस्खलन झालेल्या परिसरातील बचाव कार्य पूर्ण झाले आहे. भारतीय लष्कर आणि एनडीआरएफच्या समन्वयाने माना, चमोली येथे उच्च-जोखीम बचाव कार्याचे नेतृत्व इंडो-तिबेटी सीमा पोलिस (ITBP) यांनी केले.
माना हिमस्खलना 8 कामगारांचा मृत्यू -
चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी डॉ. संदीप तिवारी यांनी शोध आणि बचाव कार्यादरम्यान हिमस्खलनामुळे बेपत्ता झालेल्या चार कामगारांचे मृतदेह सापडल्याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या हिमस्खलनामुळे 54 कामगार बर्फात अडकले होते, त्यापैकी 46 जणांना सुखरूप वाचवण्यात आले, तर या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. तिवारी यांनी सांगितलं की, रविवारी ज्या चार कामगारांचे मृतदेह सापडले त्यांची ओळख पटली आहे.
हेही वाचा -Uttarakhand Avalanche: उत्तराखंडमधील चमोलीमध्ये हिमस्खलन! 57 BRO कामगार अडकले, 10 जणांची सुटका
तिवारी यांनी सांगितले की, सात मृत कामगारांचे मृतदेह ज्योतिर्मठ येथे आणण्यात आले आहेत. येथे त्यांचे शवविच्छेदन केले जाणार आहे. भारत-चीन सीमेवरील सुमारे 3200 मीटर उंचीवर असलेल्या माना या शेवटच्या गावात झालेल्या हिमस्खलनामुळे बीआरओ कॅम्पमधील कंटेनरमध्ये राहणारे सीमा रस्ते संघटनेचे 54 कामगार बर्फात अडकले होते. अडकलेल्या कामगारांची संख्या आधी 55 असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु यातील एका कामगाराने सुट्टी घेतली होती. त्यामुळे तो घटनास्थळी उपस्थित नव्हता.
हेही वाचा - सावधान! तुम्ही 'ही' चुकीचे औषध घेत आहात का? सरकारने 145 औषधे केली Not of Standard Quality घोषित
हवामान विभागाने सोमवारपासून पुन्हा खराब हवामानाचा अंदाज वर्तवला असल्याने, बचाव कार्याला गती देण्यासाठी हेलिकॉप्टर, स्निफर डॉग आणि थर्मल इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. लष्कर, इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), पोलिस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या 200 हून अधिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या शोध आणि बचाव कार्यादरम्यान शनिवारपर्यंत बर्फात अडकलेल्या अनेक कामगारांना वाचवण्यात आले.
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केली घटनास्थळाची पाहणी -
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हिमस्खलनग्रस्त जागेचे हवाई सर्वेक्षण केले आणि ज्योतिर्मठ येथे मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी सतत घटनेचा पाठपुरावा करून बचाव कार्य वेगाने करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.