RBI Deputy Governor: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला अखेर नवीन डेप्युटी गव्हर्नर मिळाला आहे. केंद्र सरकारने या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी डॉ. पूनम गुप्ता यांच्याकडे सोपवली आहे, त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असणार आहे. त्या जानेवारीमध्ये निवृत्त झालेल्या मायकल पात्रा यांची जागा घेतील. ही नियुक्ती अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) बैठक 7 ते 9 एप्रिल दरम्यान होणार आहे. कॅबिनेट नियुक्ती समितीने त्यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला आहे. डॉ. पूनम गुप्ता कोण आहेत? त्यांना या महत्त्वाच्या पदावर का नियुक्त करण्यात आले? ते जाणून घेऊयात.
डॉ. पूनम गुप्ता कोण आहेत?
डॉ. पूनम गुप्ता यांचे नाव अर्थशास्त्राच्या जगात सर्वपरिचित आहे. त्या सध्या भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक धोरण थिंक टँक असलेल्या नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) च्या महासंचालक आहेत. याशिवाय, त्या 16 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेच्या सदस्या देखील आहेत. पूनम पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची (EAC-PM) सदस्य आहे, म्हणजेच तिने पंतप्रधान मोदींच्या टीममध्येही काम केले आहे. याशिवाय, त्यांनी नीती आयोगाच्या विकास सल्लागार समिती आणि FICCI च्या कार्यकारी समितीवरही काम केले आहे.
हेही वाचा - Waqf Amendment Bill: वक्फ बोर्डात किती सदस्य असतील? विधेयक पारित झाल्यानंतर काय बदल होणार? जाणून घ्या
पूनम गुप्ता यांना आंतरराष्ट्रीय अनुभव -
दरम्यान, पूनम गुप्ता यांनी वॉशिंग्टन डीसी येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेत जवळजवळ 20 वर्षे वरिष्ठ पदांवर काम केले आहे. त्या इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) मध्ये ग्लोबल मॅक्रो अँड मार्केट रिसर्चसाठी लीड इकॉनॉमिस्ट होत्या. याशिवाय, त्यांनी इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स (ICRIER) आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणूनही अध्यापन केले आहे.
हेही वाचा - EPFO चा नवा निर्णय, पेन्शन आणि PF काढणे होणार आणखी सोपे
पूनम गुप्ता यांचे शिक्षण -
पूनम गुप्ता यांनी 1998 मध्ये अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केली, जिथे त्यांनी मॅक्रोइकॉनॉमिक्स, आंतरराष्ट्रीय वित्त आणि व्यापार या विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळवले. या संशोधनासाठी त्यांना 1998 मध्ये एक्झिम बँक पुरस्कारही मिळाला. यापूर्वी त्यांनी 1995 मध्ये मेरीलँडमधून अर्थशास्त्रात एमए केले. भारतात त्यांनी 1991 मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एमए आणि 1989 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून बीए (अर्थशास्त्र) पदवी प्राप्त केली.