Drunk Passenger Misbehaves on IndiGo Flight: 1 सप्टेंबर रोजी दिल्लीहून कोलकाताला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E 6571 मध्ये एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला. संबंधित प्रवाशाने केबिन क्रूशी गैरवर्तन केले तसेच सहप्रवाशांना त्रास दिला. एअरलाइनने या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, प्रवाशाला बेशिस्त घोषित करून कोलकात्यात पोहोचताच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.
प्रवासी वकील असल्याची माहिती मिळाली आहे. तो विमानात दारू पित होता, धार्मिक घोषणा देत होता आणि अनुचित वक्तव्य करत होता. मात्र, प्रवाशाने आरोप फेटाळले असून त्याने फक्त विमानात चढण्यापूर्वीच बिअर घेतल्याचे सांगितले. प्रवाशाने खरेदीची पावतीदेखील दाखवली आहे. या घटनेमुळे उड्डाणाला दिल्ली विमानतळावरच तीन तासांचा विलंब झाला. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत इंडिगोने व्यत्यय आणणाऱ्या वर्तनाविरुद्ध शून्य-सहिष्णुता धोरण पुन्हा अधोरेखित केले आहे.
हेही वाचा - Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; बसच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू
दरम्यान, 2 सप्टेंबर रोजी नागपूरहून कोलकाताला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 812 ला पक्षी धडकल्यानंतर नागपूरला परतावे लागले. वैमानिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून विमान सुरक्षितपणे उतरवले. या उड्डाणाची पुढील सेवा रद्द करण्यात आली आणि प्रवाशांना पर्यायी प्रवास तसेच परतफेडीची सुविधा देण्यात आली.
हेही वाचा - IndiGo Flight Return : मोठा अपघात टळला! पक्षी धडकल्याने नागपूर-कोलकाता इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
याशिवाय, दिल्लीतील मुसळधार पावसामुळे प्रवाशांना उड्डाणापूर्वी अतिरिक्त वेळ ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लेहमध्ये प्रतिकूल हवामानामुळे इंडिगोच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवाशांना रीबुकिंग व परतफेडीची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.