मुंबई: शुक्रवारी शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या शेअर्समध्ये तब्बल 5 % पर्यंत घसरण झाली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 5 ऑगस्ट रोजी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना चौकशीसाठी समन्स बजावल्याने शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं सांगितलं जात आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, अनिल अंबानी यांना 5 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्लीतील ईडी मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीचा केंद्रबिंदू त्यांच्या समूह कंपन्यांशी संबंधित कर्ज फसवणूक आणि मनी लाँडरिंग प्रकरण आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने 68.2 कोटींच्या बनावट बँक हमी रॅकेटमध्ये मनी लाँडरिंगची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आता अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या कंपन्यांचा संदर्भ आल्याने प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आला आहे. ही कारवाई ED च्या 17,000 कोटींच्या वेगळ्या कर्ज घोटाळ्याच्या तपासासोबत समांतर सुरु आहे. या मोठ्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर अनिल अंबानी यांना 5 ऑगस्ट रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - Trump Strikes Again: ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने कोसळले आशियाई बाजार; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण
गेल्या आठवड्यात, ईडीने मुंबईतील रिलायन्स ग्रुपशी संबंधित 35 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत सुमारे 50 कंपन्या आणि 25 व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात आली. हा नवीन खटला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 11 नोव्हेंबर 2024 रोजी नोंदवलेल्या FIR वर आधारित आहे. या चौकशीत केंद्र सरकारच्या एका संस्थेला सादर करण्यात आलेल्या बनावट बँक हमींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
हेही वाचा - ऑगस्टमध्ये UPI, FASTag सह बदलणार 'हे' नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
दरम्यान, रिलायन्स ग्रुपच्या कंपन्यांनी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईडीच्या कारवाईचा आमच्या व्यवसाय, आर्थिक स्थिती, शेअरहोल्डर्स किंवा कर्मचार्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. याशिवाय, त्यांनी माध्यमांतील अहवाल हे रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (RCom) किंवा रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) च्या 10 वर्षांहून अधिक जुन्या व्यवहारांशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले.