नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडवणारा निर्णय घेतला आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक असेसमेंट (OBA) प्रणाली लागू करण्यात येणार आहे. हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCFSE) 2023 च्या शिफारशींनुसार राबवला जाणार आहे. नवीन पद्धतीत भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान या मुख्य विषयांमध्ये दर सत्रात होणाऱ्या तीन लेखी मूल्यांकनांमध्ये ओबीएचा समावेश असेल. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान पाठ्यपुस्तके, नोट्स आणि इतर संदर्भ साहित्य पाहण्याची मुभा दिली जाईल. पारंपरिक पद्धतीतील केवळ पाठांतरावर आधारित परीक्षेपेक्षा ही पद्धत विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समज, विश्लेषण क्षमता आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांवर अधिक भर देईल.
सीबीएसईने 2023 मध्ये इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांवर पायलट प्रोजेक्ट म्हणून ओबीए प्रणालीची चाचणी घेतली होती. या प्रयोगात विद्यार्थ्यांचे गुण 12% ते 47% दरम्यान नोंदवले गेले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या पद्धतीला सकारात्मक प्रतिसाद दिला. शिक्षकांच्या मते, ही प्रणाली विद्यार्थ्यांना केवळ उत्तर पाठ करण्यापेक्षा संकल्पना समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करते.
हेही वाचा - काँग्रेसची देशव्यापी मोहिम! मतदार चोरी प्रकरणी राहुल गांधींनी लाँच केले खास पोर्टल
उद्दिष्ट आणि फायदे
सीबीएसईच्या मते, ओपन बुक असेसमेंटमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी होईल आणि वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेली विचारशक्ती विकसित होईल. यामुळे रोटरी लर्निंग (पाठांतर) कमी होऊन विद्यार्थी विषयातील सखोल समज आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित होईल.
हेही वाचा - संचार साथी अॅपचा नवा विक्रम! 5 लाखांहून अधिक हरवलेले मोबाईल सापडले, 1 कोटी बनावट सिम ब्लॉक
ओबीए प्रणाली ऐच्छिक स्वरूपात उपलब्ध असेल, मात्र सीबीएसई शाळांना ती स्वीकारण्यास प्रोत्साहित करेल. बोर्ड लवकरच मानक प्रश्नपत्रिका आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे, ज्यामुळे शाळांना वेळेत तयारी करता येईल. परीक्षेदरम्यान साहित्याचा वापर कसा करायचा, त्याचे मूल्यमापन कसे करायचे आणि प्रश्नांची रचना कशी असावी, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही दिले जाईल. या निर्णयामुळे भारतीय शिक्षण पद्धतीत एक नवा टप्पा सुरू होईल.