नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात 20 जूनपासून एकूण मान्सून मृतांची संख्या 276 वर पोहोचली आहे. त्यापैकी 143 लोक भूस्खलन, पूर आणि घरे कोसळणे यासारख्या पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृत्युमुखी पडले आहेत. तर 133 जणांनी रस्ते अपघातात जीव गमावला आहे, असे हिमाचल प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (HPSDMA) ने म्हटले आहे.
यासोबतच, गेल्या 24 तासांत मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील मोठ्या भागांना मोठा फटका बसला आहे. तसेच 366 स्ते बंद झाले आहेत. तर 929 भागात वीजपुरवठा खंडित झाला असून 139 पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत, असे एचपीएसडीएमएने सांगितले. रस्ते कोसळणे आणि भूस्खलनामुळे कुल्लूमधील राष्ट्रीय महामार्ग-305 आणि मंडीमधील राष्ट्रीय महामार्ग-154 अजूनही बंद आहे, तर मंडी, कुल्लू, कांगडा, सिरमौर आणि चंबा या जिल्ह्यांमधील डझनभर प्रमुख जोड रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत.
हेही वाचा : ‘Agni 5’ Ballistic Missile : भारताने घेतली अग्नी-5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
कुल्लूमध्ये 125 रस्ते बंद, 281 वीज वितरण ट्रान्सफॉर्मर (डीटीआर) खराब झाले आणि 56 पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला. त्यानंतर मंडीमध्ये 174 स्ते बंद, 98 डीटीआर बंद आणि 60 पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या. किन्नौरमधील लग व्हॅली, मणिकरण, सैंज, जिभी, मंडी-जोगिंदरनगर आणि थांगी-चरंग येथील अनेक भागांचा संपर्क पूर्णपणे तुटल्याचे फील्ड रिपोर्ट्समध्ये दिसून आले आहे. पुनर्संचयित करण्याचे काम सुरू होते, परंतु सततचा पाऊस आणि नव्याने भूस्खलन झाल्यामुळे त्यात अडथळा येत आहे. अधिकाऱ्यांनी लोकांना संवेदनशील भागातून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे आणि मान्सून सक्रिय असल्याने आणखी काही अडचणी येण्याची शक्यता आहे.