आज 15 ऑगस्ट 2025 रोजी देश 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्याच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी आज दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
आज राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी ध्वजारोहण केले आणि राष्ट्राला संबोधित केले. 200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी ट्विट करून भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा उत्सव देशातील एकतेची भावना बळकट करत राहतो. तिरंगा भारतातील प्रत्येक घरात आहे, मग तो वाळवंटापासून हिमालयापर्यंत असो किंवा समुद्रकिनारा असो किंवा दाट लोकवस्ती असलेला प्रदेश असो. देश एकतेची भावना बळकट करत आहे. हा सामूहिक कामगिरी आणि अभिमानाचा क्षण आहे. आज आपण तिरंग्याच्या रंगात रंगलो आहोत.
ऑपरेशन सिंदूरबद्दल केले भाष्य
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज मला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना अभिवादन करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे." पुढे ते म्हणाले की, "भारताने ठरवले आहे की, आम्ही आता अणुधोके सहन करणार नाही. आम्ही आता ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही."
नैसर्गिक आपत्तीचाही उल्लेख
पंतप्रधान मोदींनी नैसर्गिक आपत्तीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, निसर्ग आपल्या सर्वांची परीक्षा घेत आहे. गेल्या काही दिवसांत आपण नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन, ढगफुटी इत्यादींना तोंड देत आहोत. आमच्या सहानुभूती पीडितांसोबत आहेत.
आत्मनिर्भर भारत
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गुलामगिरीने आपल्याला गरीब बनवले, गुलामगिरीने आपल्याला परावलंबी बनवले, आपले इतरांवरचे अवलंबित्व वाढले. स्वातंत्र्यानंतर लाखो लोकांना अन्न पुरवणे हे एक मोठे आव्हान होते, परंतु माझ्या देशातील शेतकऱ्यांनी कठोर परिश्रम करून देशाचे अन्नसाठे भरले. अन्नधान्याच्या क्षेत्रात देश स्वयंपूर्ण झाला. आजही, राष्ट्राच्या स्वाभिमानाचा सर्वात मोठा निकष म्हणजे त्याचे स्वावलंबन. विकसित भारताचा पाया देखील 'आत्मनिर्भर भारत' आहे.
दिवाळीत मिळणार मोठं गिफ्ट :
या दिवाळीत देशाला एक मोठी भेट दिली जाईल. दिवाळीत जीएसटी सुधारणा केली जाईल आणि कर मोठ्या प्रमाणात कमी केले जातील. दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. जीएसटी कमी करणे ही काळाची गरज आहे. सामान्य लोकांसाठी कर कमी केला जाईल.
तरुणांनादेखील खास भेट
पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना एक खास भेट दिली आहे. त्यांनी पंतप्रधान विकास भारत योजनेची घोषणा केली आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून लागू केली जात आहे. याअंतर्गत, तरुणांना सरकारकडून दरमहा 15000 रुपये दिले जातील.