Smartphone Export : भारतातील स्मार्टफोनची निर्यात एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत विक्रमी 1.55 लाख कोटींवर पोहचली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. सरकारच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेच्यामदतीने या निर्यातीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 1.31 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आजवर एका महिन्यात झालेली सर्वाधिक 25 हजार कोटी रुपयांच्या स्मार्टफोन्सची निर्यात ही जानेवारी महिन्यात नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे जानेवारी 2024 च्या तुलनेत जानेवारी 2025 झालेली निर्यातीमधील वाढ ही 140 टक्क्यांनी जास्त आहे.
जानेपारीपर्यंत गेल्या दहा महिन्यांत ही निर्यात आर्थिक वर्ष 2024 च्या याच कालावधीत झालेल्या 99,120 कोटी रुपयांच्या स्मार्टफोन निर्यातीपेक्षा 56% जास्त आहे. यापैकी जवळपास 70 टक्के वाटा हा फॉक्सकॉनसह काही अॅपल आयफोन विक्रेत्यांचा राहिला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत फॉक्सकॉनच्या निर्यातीत 43 टक्के वाढ झाली आहे.
हेही वाचा - Big shift in the Gold Market : लंडनहून विमाने भरून भरून सोने न्यूयॉर्कला पाठवले जात आहे, काय आहे कारण?
जवळपास 22 टक्के निर्यात आयफोन व्हेंडर टाटा इलेक्ट्रॉनिक्सकडून झालेली आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी विस्ट्रॉन(Wistron) कडून ताबा घेतल्यानंतर कर्नाटक युनिटमध्ये त्यांचे उत्पादन वेगाने वाढवत आहे. तर 12 टक्के वाटा तामिळनाडू येथील पेगाट्रॉनचा आहे. यामध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सने काही दिवसांपूर्वीच हिस्सेदारी विकत घेतली आहे. एकूण निर्यातीपैकी सुमारे 20 टक्के वाटा हा सॅमसंगचा आहे. उर्वरित वाटा हा देशांतर्गत कंपन्या आणि मर्चंट निर्यातीचा आहे.
यादरम्यान केंद्रीय इलेक्ट्र्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आर्थिक वर्ष 2025 मध्ये स्मार्टफोन निर्यात 20 अब्ज डॉलर्स किंवा 1.68 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळीत भारताचे स्थान आणखी मजबूत होईल.
स्मार्टफोन निर्यातीची मोठी झेप
देशातून निर्यात केल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये स्पार्टफोन दशकभरापूर्वी 67 व्या क्रमांकावर होते. पण आता ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 2020 मध्ये पीएलआय योजना सादर करण्यात आली आणि एप्रील 2021 मध्ये ती पूर्णपणे लागू करण्यात आली, त्यानंतर प्रत्येक वर्षात स्मार्टफोनची निर्यात वाढली आहे.
ही वाढ आर्थिक वर्ष 2021 च्या 23,390 कोटी रूपयांवरून जवळ दुप्पट वाढून आर्थिक वर्ष 2022 मध्ये 47,340 कोटी रुपयांवर पोहचली. ही वाढ आर्थिक वर्ष 2023 मध्ये देखील कायम राहिली आणि ती 91,652 कोटी रूपयांवर पोहचली. आर्थिक वर्ष 2024 मध्ये ही वाढ थेट 1.31 लाख कोटी रुपयांवर जाऊन पोहचली.
हेही वाचा - Global Market Crash : ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक शेअर बाजार कोसळले, आयात शुल्क वाढीचा जगभरात गुंतवणूकदारांना फटका
असा झाला योजनेचा फायदा
पीएलआय योजना विशेषतः मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देते. पीएलआय योजनेच्या दूरसंचार विभागानेच 3,400 कोटी रुपयांची गुंतवणूक खेचून आणली आहे. दूरसंचार उपकरणांचे उत्पादन 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे आणि 10,500 कोटी रुपयांची निर्यात निर्माण केली आहे. या उपक्रमामुळे 17,800 हून अधिक प्रत्यक्ष नोकऱ्या आणि अनेक अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत.