नवी दिल्ली: देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देताना प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे केले आहे. धनखड यांनी राष्ट्रपतींना आपल्या राजीनाम्याबद्दल पत्र लिहिले आहे. राष्ट्रपतींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात जगदीप धनखड यांनी लिहिले आहे की, आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी संविधानाच्या कलम 67 (अ) नुसार तात्काळ प्रभावाने भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.
धनखड यांनी म्हटले आहे की, भारताच्या महामहिम माननीय राष्ट्रपतींनी माझ्या कार्यकाळात दिलेल्या अढळ पाठिंब्याबद्दल आणि आमच्यात असलेल्या आनंददायी आणि अद्भुत कामकाजाच्या संबंधांबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी माननीय पंतप्रधान आणि आदरणीय मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो. पंतप्रधानांचे सहकार्य आणि पाठिंबा अमूल्य आहे. मी माझ्या कार्यकाळात बरेच काही शिकलो आहे. सर्व माननीय संसद सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास माझ्या स्मरणात कायम राहील.
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती म्हणून कार्यकाळ 2027 पर्यंत होता. परंतु दोन वर्षांपूर्वी त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता. अशा परिस्थितीत उपराष्ट्रपतींनी राजीनामा देणे हा सर्वांसाठी धक्कादायक निर्णय होता.
हेही वाचा - केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ मार्क्सवादी नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचे निधन
दरम्यान, 9 मार्च 2025 रोजी छातीत दुखणे आणि अस्वस्थता यामुळे त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयरोग विभागाच्या क्रिटिकल केअर युनिट (CCU) मध्ये दाखल करण्यात आले होते. 12 मार्चला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी न झाल्याचे दिसून आले. अखेर आज प्रकृती अस्वस्थतेच्या कारणांमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
हेही वाचा - ईडीला सुप्रीम कोर्टाचा दणका; 'राजकारणासाठी न्यायालयाचा गैरवापर करू नका'
जगदीप धनखड हे एक अनुभवी वकील आहेत. त्यांनी राजस्थानमधून खासदार आणि आमदार म्हणूनही कार्य केले आहे. याशिवाय, 2019 साली त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नंतर 2022 साली ते भारताचे 14 वे उपराष्ट्रपती बनले. कार्यकाळ संपण्याच्या दोन वर्ष आधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.