हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील गुलजार हाऊसमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सकाळी 6 वाजता आग लागली. गुलजार हाऊसमधून धूर निघताना लोकांना दिसला. लोकांनी स्वतःहून पोलिसांना आणि अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. अग्निशमन दल येण्यापूर्वीच लोकांनी बचावकार्य सुरू केले होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीत 30 हून अधिक लोक भाड्याने राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.
आगीच्या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक -
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी गुलजार हाऊसमधील आगीच्या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, अपघातात अनेक लोकांचा मृत्यू होणे हे खूप दुःखद आहे. मदतकार्याला गती देण्याचे आणि जखमींना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आगीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जखमींना उस्मानिया, मलकपेट यशोदा, डीआरडीओ आणि अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात अपघाताचे कारण कॉम्प्रेसरचा स्फोट असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचा तपास हैदराबादच्या दक्षिण विभाग पोलिस पथकाकडे सोपवण्यात आला आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये आरोपींसोबत पोलिसांची पार्टी; चार पोलिसांविरुद्ध कारवाई सुरू
पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना -
दरम्यान, आगीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हैदराबादमधील आगीच्या घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याने पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने एक्स हँडलवर एक ट्विट करण्यात आले. 'ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल संवेदना. जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.'
हेही वाचा - बीडमधील तरुणाने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून संपवले जीवन; पुण्यात केली आत्महत्या
जखमींच्या प्राथमिक चौकशीत गुलजार हाऊसमध्ये सुमारे 30 लोक राहत असल्याचे समोर आले आहे. उष्णता वाढल्यामुळे एसी गरम झाला असावा आणि वायरिंगमधून निघालेल्या ठिणगीमुळे आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जेव्हा लोकांना काहीतरी जळण्याचा वास आला तेव्हा त्यांना आग लागल्याचे आढळले. आगीने संपूर्ण इमारतीला इतक्या लवकर वेढले की कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. भीषण आगीमुळे लोकही बचावासाठी आत येऊ शकले नाहीत.