Monday, September 01, 2025 10:48:17 AM

Ramadan 2025: आज देशात कोठेही दिसला नाही रमजानचा चंद्र! आता रविवारी ठेवण्यात येणार पहिला रोजा

रमजानचा चंद्र शुक्रवारी दिल्लीसह देशाच्या कोणत्याही भागात दिसला नाही. त्यामुळे आता रमजानचा पहिला रोजा रविवारी ठेवण्यात येणार आहे.

ramadan 2025 आज देशात कोठेही दिसला नाही रमजानचा चंद्र आता रविवारी ठेवण्यात येणार पहिला रोजा
Ramadan 2025
Edited Image

Ramadan 2025: इस्लामच्या पवित्र महिन्याचा, रमजानचा चंद्र शुक्रवारी दिल्लीसह देशाच्या कोणत्याही भागात दिसला नाही. त्यामुळे आता रमजानचा पहिला रोजा रविवारी ठेवण्यात येणार आहे. चांदणी चौकातील फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम मौलाना मुफ्ती मुकर्रम अहमद यांनी सांगितले की, दिल्ली-एनसीआर सकाळपासून ढगांनी झाकलेले होते, त्यामुळे येथे चंद्र दिसत नव्हता. तथापी, गुजरात, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह अनेक ठिकाणी संपर्क साधण्यात आला होता. परंतु कुठूनही चंद्र दिसल्याची पुष्टी झालेली नाही.

रमजानचा पहिला उपवास 2 मार्च रोजी - 

मुफ्ती मुकर्रम अहमद यांनी सांगितले की, साधारणपणे गुजरातच्या कच्छ भागात चंद्र दिसतो, परंतु तिथूनही रमजानचा चंद्र दिसल्याची कोणतीही बातमी नाही. म्हणून पहिला उपवास 2 मार्च रोजी म्हणजे रविवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार हा इस्लामिक कॅलेंडरचा आठवा महिना 'शाबान' चा 30 वा दिवस आहे. इस्लाममध्ये महिना 29 किंवा 30 दिवसांचा असतो. तसेच महिन्यातील दिवसांची संख्या चंद्राच्या दर्शनावर अवलंबून असते.

हेही वाचा - Ramadan 2025 Start Date: रमजानचा महिना कधी सुरु होणार?

दरम्यान, जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद शबान बुखारी यांनी सांगितले की, आज रमजान-उल-मुबारकचा चंद्र दिसला नाही. त्यामुळे, पहिला रोजा 2 मार्च 2025 रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मुस्लिम संघटना इमरत-ए-शरिया हिंदने एका निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीत ढगाळ आकाश असल्याने राष्ट्रीय राजधानीत चंद्र दिसत नव्हता. रमजानचा चंद्र दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी पवित्र महिना सुरू होतो आणि पुढील 30 दिवस मुस्लिम सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीही खात किंवा पित नाहीत. तसेच ते त्यांचा बहुतेक वेळ अल्लाहची उपासना करण्यात घालवतात. तसेच संध्याकाळी मशिदींमध्ये विशेष नमाज अदा केली जाते ज्याला 'तरावीह' म्हणतात. या नमाजात संपूर्ण कुराण पठण केले जाते.

हेही वाचा - Surya Grahan 2025: चैत्र अमावस्येला लागणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण

रमजानच्या वेळापत्रकानुसार, दिल्लीत रविवारी पहिल्या उपवासाच्या सेहरी (सूर्योदयापूर्वी जेवण) ची वेळ सकाळी 5.28 वाजता संपेल आणि इफ्तार (उपवास सोडण्याची) वेळ संध्याकाळी 6.21 वाजता आहे. मुफ्ती मुकर्रम यांनी मुस्लिम समुदायाला रमजान महिन्यात नमाज अदा करण्याचे आणि देशातील 140 कोटी लोकांच्या कल्याणासाठी शक्य तितकी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.

Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही. 
 


सम्बन्धित सामग्री