Monday, September 01, 2025 04:25:09 AM

पाकिस्तानासाठी हेरगिरी प्रकरणात पंजाबमधील आणखी एक युट्यूबर अटकेत

पंजाबमध्ये पाकिस्तानी हेरगिरी प्रकरणी जसबीर सिंग नावाच्या युट्यूबरला अटक, ज्याचा ISI एजंटांशी संबंध असल्याचा संशय, तपास सुरू आहे.

पाकिस्तानासाठी हेरगिरी प्रकरणात पंजाबमधील आणखी एक युट्यूबर अटकेत

नवी दिल्ली: पंजाबमध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणात आणखी एका युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. जसबीर सिंग असं अटक करण्यात आलेल्या युट्यूबरचं नाव असून, तो 'जान महल' या नावाने युट्यूब चॅनेल चालवत होता. त्याच्या चॅनेलला जवळपास 11 लाख सबस्क्रायबर्स आहेत. यापूर्वी हरियाणामधील ज्योती मल्होत्रा या महिला युट्यूबरला याच प्रकरणात अटक करण्यात आली होती.

जसबीर सिंग हा रूपनगर जिल्ह्यातील महलान गावचा रहिवासी असून, त्याला मोहाली येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेल (SSOC) ने अटक केली. पोलिसांनी सांगितले की गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान, जसबीर सिंगच्या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या (ISI) एजंटांशी जवळच्या संबंधांचा खुलासा झाला आहे. त्याचे संबंध शाकीर उर्फ जुट रंधावा या भारतीय वंशाच्या पाकिस्तानी एजंटशी होते, जो सध्या ISI साठी कार्यरत असल्याचा संशय आहे.

हेही वाचा: मलिन प्रतिमा असलेल्या व्यक्तींना पक्षात स्थान मिळणे योग्य नाही; बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला सीमा हिरेंचा विरोध

पोलिसांच्या माहितीनुसार, जसबीर सिंग याचा नियमित संपर्क हरियाणातील ज्योती मल्होत्राशी होता. दोघांमधील संवाद तपास यंत्रणांकडून सध्या तपासला जात आहे. इतकंच नव्हे तर जसबीर सिंगचा संपर्क एहसान-उर-रहीम उर्फ दानिश या पाकिस्तानी नागरिकाशीही असल्याचे समोर आले आहे. या दानिशच्या आमंत्रणावरूनच जसबीर सिंग दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात 23 मार्च रोजी झालेल्या पाकिस्तान नॅशनल डे समारंभात सहभागी झाला होता.

तपासादरम्यान असेही निष्पन्न झाले आहे की, जसबीर सिंगने 2020, 2021 आणि 2024 मध्ये तीन वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे. त्याच्याकडील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कसून तपासणी करण्यात आली असून, त्यात अनेक पाकिस्तानमधील संपर्कांची माहिती सापडली आहे. या सर्व भेटीदरम्यान त्याने काही संवेदनशील माहिती शेअर केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर जसबीर सिंगने आपल्याकडील सर्व डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. विशेषतः ISI शी संबंधित लोकांशी झालेले संवाद आणि कॉल लॉग्स हटवण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र, पोलिसांनी त्याच्या डिव्हाइसेसवरून काही महत्वाचे पुरावे मिळवले आहेत.

हेही वाचा: 'आरोपीकडून तब्बल 300 कोटी मागितले, हे अधिकारी फॉल्टी...' आमदार सुरेश धस यांचा सुपेकरांवर गंभीर आरोप

पंजाब पोलिसांनी X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत माहिती देत म्हटले आहे की, या हेरगिरी प्रकरणात अजूनही काही आरोपींचा शोध सुरु आहे. सोशल मीडियाचा वापर करून गुप्त माहिती गोळा करणे आणि ती परदेशात पाठवणे हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

सध्या या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसह संयुक्त पातळीवर सुरु आहे. युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून देशविरोधी कृत्यं करण्यात येत असल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. लवकरच आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री