Reliance Intelligence: भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने देशात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आणि गती देण्यासाठी ‘रिलायन्स इंटेलिजेंस’ नावाची नवीन उपकंपनी सुरू केली आहे. ही कंपनी पूर्णपणे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची असून, भारताला आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या आघाडीवर आणणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे.
कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस रिलायन्सच्या डीप-टेक व्यवसायाचा मुख्य भाग बनत आहे. यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आज आम्ही रिलायन्स इंटेलिजेंस ही नवीन पूर्ण मालकीची कंपनी स्थापन केली आहे. हे एक महत्वाकांक्षी पाऊल आहे ज्यामुळे भारत एआय क्षेत्रात आघाडीवर येईल.'
हेही वाचा: Reliance Jio IPO: रिलायन्स जिओचा आयपीओ कधी येणार? गुंतवणूकदारांसाठी मुकेश अंबानींनी केली खास घोषणा
रिलायन्सने या नव्या उपक्रमासाठी गुगल आणि मेटा यांसारख्या आंतरराष्ट्रीय दिग्गज कंपन्यांशी भागीदारी केली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, 'गुगल आणि रिलायन्स मिळून जेमिनी एआय मॉडेल्सचा समावेश करतील, जामनगरमध्ये हरित ऊर्जेवर चालणारे क्लाउड डेटा सेंटर उभारतील, तसेच एआय स्मार्टफोन आणि उपकरणांची निर्मिती करतील. गुगल क्लाउड आता रिलायन्सचा प्रमुख सार्वजनिक क्लाउड भागीदार असेल.'
तसेच मेटासोबतही रिलायन्सने एक संयुक्त उपक्रम जाहीर केला आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले, “आम्हाला भारतातील प्रत्येक व्यक्तीस एआय सेवा देण्याची इच्छा आहे. ही भागीदारी ओपन-सोर्स एआयला राष्ट्रीय स्तरावर सुरक्षित पद्धतीने विकसित करण्यास मदत करेल.”
रिलायन्स इंटेलिजेंस पुढील चार प्रमुख प्रकल्पांवर काम करणार आहे:
-जामनगरमध्ये गिगावॅट-स्केल एआय-रेडी डेटा सेंटरची निर्मिती; जे हरित ऊर्जेवर चालेल.
-जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि ओपन; सोर्स समुदायाशी धोरणात्मक भागीदारी.
-शिक्षण क्षेत्रात एआय सेवा उपलब्ध करून देणे; डिजिटल शिक्षणासाठी नव्या साधनांचा विकास.
-आरोग्य, शेती आणि लघु व्यवसायात एआयचा विस्तार; स्थानिक व्यवसायांना आणि शेतकऱ्यांना स्मार्ट सोल्यूशन्स देणे.
विशेष म्हणजे, रिलायन्सने AI क्षेत्रात भारताला जागतिक नकाशावर आणण्याचा दृष्टीकोन ठेवला आहे. हे पाऊल देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात नवा अध्याय उघडेल, तर स्थानिक उद्योग आणि शेतकऱ्यांसाठीही नवीन संधी निर्माण होईल.
मुकेश अंबानी म्हणाले की, 'रिलायन्स इंटेलिजेंस फक्त व्यवसायासाठी नाही, तर भारताला डिजिटल, स्मार्ट आणि AI-समर्थ राष्ट्र बनवण्यासाठी आहे. गुगल-मेटा यांसारख्या तंत्रज्ञान दिग्गजांची साथ ही यशाची हमी आहे.'
या नव्या उपक्रमामुळे भारतातील एआय उद्योगाला नवे वारे लागणार आहेत. शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग या क्षेत्रात स्मार्ट AI साधने आणून स्थानिक उद्योगांनाही जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवले जाईल.