काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे ट्वीट केले आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या धैर्याने आणि शौर्याने आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली.” मात्र, ‘श्रद्धांजली’ हा शब्द वापरण्याने अनेक शिवभक्त आणि राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला. त्यांचा आक्षेप होता की, शिवाजी महाराज जिवंत आहेत, ते महाराष्ट्राच्या हृदयात वसले आहेत, त्यामुळे श्रद्धांजली नव्हे तर अभिवादन करायला हवे होते.
या ट्वीटवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले की, “हे महाराष्ट्राचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे आदर्श आहेत. त्यांच्या नावाचा अपमान करणे लाखो-कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांनी माफी मागावी.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून भाजप आणि शिवसेनेने यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
हेही वाचा : “छावा टॅक्स फ्री का नाही? मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट कारण!”
दरम्यान, शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनीही राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले, “औरंगजेबाच्या पिल्लावळीकडून याहून वेगळे काय अपेक्षित असणार? हे हिरवे साप आहेत आणि औरंगजेबाच्या विचारांवरच राजकारण करत आहेत. राहुल गांधींनी महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेची आणि संपूर्ण देशातील शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे.” या टीकेमुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून काँग्रेसकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पुढे या वादाला कोणते वळण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.