Monday, September 01, 2025 10:54:31 AM

शरद पवारांच्या NCP चा मोदी सरकारला पाठिंबा, सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

केंद्र सरकारकडून सभागृहात मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला शरद पवार गटाने पाठिंबा दिला.

शरद पवारांच्या ncp चा मोदी सरकारला पाठिंबा सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण
शरद पवारांच्या NCP चा मोदी सरकारला पाठिंबा, सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

मुंबई: लोकसभा अधिवेशनाच्या इतिहासात 2 एप्रिल 2025 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. या दिवशी लोकसभेत वक्फ विधेयक 2025 वर तब्बल 12 तासांपेक्षा अधिक काळ चर्चा झाली आणि अखेरीस मध्यरात्रीनंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. पण संसदेचं कामकाज इथेच थांबलं नाही. मध्यरात्रीनंतर केंद्र सरकारकडून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि त्यावरही जोरदार चर्चा रंगली. विशेष म्हणजे, या प्रस्तावाला शरद पवार गटाने देखील पाठिंबा दिला. 

केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर विरोधकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. पण सरकारने मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीची सविस्तर माहिती सभागृहात दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या विषयावर भाष्य करताना सांगितलं की, ‘मणिपूरमध्ये मागील चार महिन्यांपासून कोणताही हिंसाचार झालेला नाही. मैतयी आणि कूकी समाजांमध्ये शांततेसाठी चर्चा सुरू आहे आणि सरकार यावर सकारात्मक उपाययोजना करत आहे.’ 

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; राज्य महिला आयोगाकडून घटनेची दखल

शाह यांनी सभागृहात सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसंच त्यांनी येत्या काळात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असं आश्वासन देखील दिलं. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानंही पाठिंबा दिला. या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतची माहिती X या सोशल मीडियावर पोस्ट टाकत केली आहे.

हेही वाचा - Solapur Earthquake: सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सुप्रिया सुळे यांची X वर पोस्ट 
सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘मणिपूरमधील परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव योग्य असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्यास पाठिंबा देत आहे. पण तिथे लवकरात लवकर लोकशाही प्रक्रिया पूर्ववत होऊन निर्भय वातावरणात निवडणुका होणे गरजेचे आहे.’ 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच इतर काही विरोधी पक्षांनीही मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. पण त्याचवेळी त्यांनी केंद्र सरकारला लवकरात लवकर परिस्थिती सामान्य करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केलं.  


सम्बन्धित सामग्री