26/11 Mumbai Attack: मुंबई 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याची भारतीय यंत्रणा सतत चौकशी करत आहेत. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत आरोपी राणाने अनेक मोठे खुलासे केले आहेत. राणाने सांगितले की तो पाकिस्तानी सैन्याचा एजंट होता. लष्कर संघटना केवळ दहशतवादी हल्ल्यांसाठीच नाही तर हेरगिरी म्हणूनही काम करते, असंही राणाने सांगितलं आहे. तथापी, राणाने दावा केला की तो पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू व्यक्ती होता. त्याने म्हटले की इराकने कुवेतवर केलेल्या आक्रमणादरम्यान त्याला सौदी अरेबियाला गुप्त मोहिमेवर पाठवण्यात आले होते, जे पाकिस्तानी लष्करी आस्थापनेसाठी त्याचे धोरणात्मक महत्त्व दर्शवते.
तहव्वुर राणाने त्याच्या कबुलीजबाबात म्हटले आहे की, मुंबईत इमिग्रेशन फर्म उघडण्याची कल्पना त्याची होती. त्याने एजन्सींना सांगितले की, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी तो मुंबईत उपस्थित होता. इतकेच नाही तर तो संपूर्ण कटाचा भाग होता. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने या हल्ल्यात पूर्ण सहकार्य केले होते. राणाने मुंबई गुन्हे शाखेला सांगितले की, त्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारख्या ठिकाणांची रेकी केली होती.
हेही वाचा - तहव्वुर राणाचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला! 6 जूनपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी
राणाने सांगितलं की, त्याने 1986 मध्ये रावळपिंडीच्या आर्मी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले, त्यानंतर त्याला क्वेटामध्ये कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याने सिंध, बलुचिस्तान, बहावलपूर आणि सियाचीन-बालोत्रा सेक्टरसह पाकिस्तानच्या अनेक संवेदनशील लष्करी क्षेत्रातही काम केले. चौकशीदरम्यान राणाने अब्दुल रहमान पाशा, साजिद मीर आणि मेजर इक्बाल यांना ओळखत असल्याचेही कबूल केले. हे तिघेही पाकिस्तानी नागरिक आहेत. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते. राणा हिंदी, इंग्रजी, अरबी आणि पश्तो अशा अनेक भाषांमध्ये पारंगत आहे.
हेही वाचा - आता मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा होणार! NIA ने घेतले तहव्वुर राणाच्या आवाजाचे आणि हस्ताक्षराचे नमुने
हेडलीबद्दल केले धक्कादायक खुलासे -
तथापी, गुन्हे शाखेला दिलेल्या जबाबात राणाने डेव्हिड हेडलीबद्दलही अनेक खुलासे केले आहेत. त्याने सांगितले की 2003 ते 2004 दरम्यान हेडलीने लष्कर-ए-तोयबासोबत तीन प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये भाग घेतला होता. याशिवाय, मुंबईत पहिले इमिग्रेशन सेंटर उघडण्याची कल्पना कोणाची होती असे विचारले असता, राणाने दावा केला की ही पूर्णपणे त्याची स्वतःची कल्पना होती. तसेच हेडलीला पाठवलेल्या पैशांबाबत माहिती देताना राणाने सांगितले की हे पैसे व्यवसाय खर्चासाठी पाठवले गेले होते.