Monday, September 01, 2025 09:19:04 AM

तीन वर्षांच्या पीडित मुलीबाबत जिल्हाधिकाऱ्याचं धक्कादायक वक्तव्य; म्हणे, 'तिनेच आरोपीला लैंगिक शोषण करायला प्रवृत्त केलं असेल!'

पीडित मुलीविषयी दया, सहानुभूती, संवेदनशीलता असण्याच्या ऐवजी या जिल्हाधिकाऱ्यांना बलात्कारी व्यक्तीचाच जास्त कळवळा असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून निदर्शनास येत आहे.

तीन वर्षांच्या पीडित मुलीबाबत जिल्हाधिकाऱ्याचं धक्कादायक वक्तव्य म्हणे तिनेच आरोपीला लैंगिक शोषण करायला प्रवृत्त केलं असेल

चेन्नई : यूपीएससी परीक्षेत आयएएस रँकिंग मिळणं किंवा जिल्हाधिकारी बनणं ही समाजात अत्यंत मानाची बाब समजली जाते. या पदावरील व्यक्तीला लोकांकडून आदर दिला जातो. अनेक तरुण-तरुणी खूप मेहनत करून या पदावर पोहोचण्याचं ध्येय बाळगून असतात. मात्र, अनेकदा असे उच्चपदस्थ लोक शैक्षणिक दर्जा चांगला असला तरी सुसंस्कृत असतीलच असं नाही, असाही अनुभव येतो. अनेकदा अशा लोकांमध्ये माणुसकीचाही अभाव दिसून येतो.

असाच अनुभव तमिळनाडूच्या मयिलादुथुराई जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी ए. पी. महाभारती यांच्या बाबतीत आला आहे. तीन वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण व तिच्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणावर जिल्हाधिकाऱ्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या पीडित मुलीविषयी दया, सहानुभूती, संवेदनशीलता असण्याच्या ऐवजी या जिल्हाधिकाऱ्यांना बलात्कारी व्यक्तीचाच जास्त कळवळा असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून निदर्शनास येत आहे. या प्रकरणावर भाष्य करताना जिल्हाधिकारी म्हणाले, “पीडित मुलीच्या कृतीमुळे अथवा वागण्यामुळे हल्लेखोर असं करण्यास प्रवृत्त झाला असेल. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी मुलगी आरोपीच्या तोंडावर थुंकली होती. मुलीची ही कृती पुढच्या घटनेला कारणीभूत ठरलेली असू शकते”. जिल्हाधिकाऱ्यांच्या या वक्तव्यानंतर जनतेतून संतापाची लाट उसळली.

हेही वाचा - Bengaluru: कुंपणानेच शेत खाल्लं तर..? 17वर्षीय बलात्कार पीडिता तक्रार नोंदवायला गेली.. पण पोलिसानेच पुन्हा केला बलात्कार

इतक्या चिमुकल्या जीवाचं लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाविषयी अशा शब्दांत सहानुभूती दाखवणं हे अशा अत्याचारी प्रवृत्तीलाच चालना देणारं आहे. यामुळे जिल्हाभरातून संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी या जिल्हाधिकाऱ्यावर असंवेदनशीलता दाखवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, प्रशासनाने तातडीने पावलं उचलत जिल्हाधिकाऱ्याची बदली केली आहे.

लहान मुलांची कोणतीही खट्याळपणाची कृती एखाद्या वेळेस रागावण्याला  किंवा छोट्या-मोठ्या शिक्षेला पात्र असू शकते. मात्र, या मुलीची एखाद्याच्या तोंडावर थुंकण्याची कृती त्याला बलात्कार करायला प्रवृत्त करू शकते, असं म्हणणं खूपच भयंकर आहे. तेही असं वक्तव्य एखाद्या जबाबदारीचं पद सांभाळणाऱ्या व्यक्तीने करणं हे मुळीच क्षम्य नाही. असे वक्तव्य करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला जनाची-मनाची तर नाहीच, पण पदाची आणि जबाबदारीचीही जाणीव नसल्याचं दिसत आहे, अशा प्रतिक्रिया लोकांकडून समोर येत आहेत.

म्हणे, 'मुलीचं वय चांगले संस्कार करण्याचं..', अन् बलात्काऱ्यावर झालेल्या संस्कारांचं काय?
इतकंच नव्हे तर, या मुलीचं वय चांगल्या सवयी लावण्याचं आणि चांगले संस्कार करण्याचं आहे आणि ते तिच्या आई-वडिलांनी करायला हवेत, असं म्हणत या जिल्हाधिकाऱ्यांनी अकलेचे तारे तोडले. मात्र, बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारावर त्याच्या वयाला साजेसे संस्कार झालेले आहेत की नाहीत, याविषयी ते साफ विसरले.

काय म्हणाले जिल्हाधिकारी?
जिल्हाधिकारी ए. पी. महाभारती लहान मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीप्रती सहानुभूती व्यक्त करत म्हणाले की “अशा प्रकरणांमध्ये आपण दोन्ही बाजू तपासून पाहायला हव्यात. मुलांचं वय असं असतं की आपण त्यांना समजावू शकतो, शिकवू शकतो. मुलांच्या आई-वडिलांनी याकडे लक्ष द्यायला हवं. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी त्यांचीच असते. या विषयांवर संवेदनशीलता वाढायला हवी आणि लोकांना जागरुक करायला हवं”. जिल्हाधिकाऱ्यांचं हे वक्तव्य समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप केला आहे की ते पीडितेला दोषी ठरवत तिच्याप्रती असंवेदनशीलता दाखवत आहेत आणि आरोपीचा अधिक विचार करत आहेत.

विरोधकांचा जिल्हाधिकाऱ्यांसह सरकारवर हल्लाबोल
तमिळनाडू भाजपा अध्यक्ष अन्नामलाई यांनी जिल्हाधिकारी महाभारती यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला. ते म्हणाले, 'केवळ साडेतीन वर्षांच्या त्या मुलीने गुन्हेगाराला लैंगिक शोषण करायला प्रवृत्त केलं असेल हे जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य किळसवाणं आहे. मी तमिळनाडू भाजपाच्या वतीने महाभारती यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवतो.' अन्नामलाई यांनी राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांविरोधातील अपराधांचं वाढलेलं प्रमाण, लैंगिक अत्याचारांच्या वाढलेल्या घटना पाहून राज्य सरकारची किव येते. महिला, शाळकरी मुली आणि चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री या सगळ्या घटनांबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत. मंत्री पीडितांची ओळख उघड करून असंवेदनशीलता दाखवत आहेत. अशातच एका जिल्हाधिकाऱ्याने केलेलं हे वक्तव्य असंवेदनशीलतेचा कळसच आहे. खरंतर ही या सरकारचीच प्रवृत्ती आहे.

हेही वाचा - School Blast: विद्यार्थी की गुन्हेगार? शाळेतील शौचालयात घडवून आणला स्फोट; चौथीची मुलगी जखमी, कारण समजल्यावर सगळे हादरले


सम्बन्धित सामग्री