उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती बिघडली, एम्स रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना रविवारी (९ मार्च) पहाटे अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत वेदना जाणवू लागल्यानं दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) येथे दाखल करण्यात आलं आहे. एम्समधील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री झोपताना धनखड यांना अस्वस्थता जाणवू लागली. पहाटेच्या सुमारास त्यांना छातीत वेदना होऊ लागल्या. त्यामुळे कुटुंबीय आणि सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ त्यांना एम्स रुग्णालयात हलवले. पहाटे २ वाजता त्यांना एम्सच्या कार्डिओलॉजी विभागात दाखल करण्यात आले.
आयसीयूमध्ये सुरू आहेत उपचार
सध्या धनखड त्यांच्यावर क्रिटिकल केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. कार्डियॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर राजीव नारंग हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. याबाबत अद्याप रुग्णालयाकडून कोणतीही माहिती अद्याप देण्यात आली नाही.
हेही वाचा - आईच बनली वैरीण! 14 वर्षांच्या मुलीचा 29 वर्षीय पुरुषाशी बालविवाह; सासरी जायला नकार दिल्यावर खेचत नेलं..
जेपी नड्डा यांनी केली प्रकृतीची विचारणा
वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, उपराष्ट्रपतींची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. धनखड यांना एम्समध्ये दाखल केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि ते एम्समध्ये पोहोचले.
हेही वाचा - दिल्लीतील महिलांना आता दरमहा 2500 रुपये मिळणार! मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली 'महिला सन्मान योजने'च्या प्रस्तावाला मंजुरी
कोण आहेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड?
जगदीप धनखड हे भारताचे १४ वे उपराष्ट्रपती आहेत. त्यांनी २०२२ मध्ये पदभार स्वीकारला. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात जन्मलेले धनखड हे वकील, राजकारणी आणि माजी लोकसभा खासदार राहिले आहेत. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.