Sunday, August 31, 2025 06:26:40 AM

Jagdeep Dhankhar : सध्या काय करतायत जगदीप धनखड? त्यांच्या दिनचर्येबद्दल ही खास माहिती आली समोर

जगदीप धनखड यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच अचानकपणे राजीनामा दिल्याने तर्कवितर्क सुरू झाले. कारण, त्यांच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 21 जुलैला आरोग्याचे कारण देत त्यांनी पद सोडले.

jagdeep dhankhar  सध्या काय करतायत जगदीप धनखड त्यांच्या दिनचर्येबद्दल ही खास माहिती आली समोर

 Ex-Vice President Jagdeep Dhankhar's Life After Resignation : उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड आता योगा आणि टेबल टेनिसमध्ये वेळ घालवत आहेत. 21 जुलै रोजी त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव पद सोडले. अचानकपणे हा राजीनामा आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. आता 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, धनखड सध्या कुठे आहेत, काय करत आहेत, त्यांची तब्येत कशी आहे, याविषयी विरोधकांनी आक्रमकपणे विचारणा करण्यास सुरुवात केली होती. तसेच, याविषयी काही अटकळीही बांधल्या गेल्या.

गेल्या महिन्यात उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड आता कुटुंबासोबत (Jagdeep Dhankhar Family) वेळ घालवत आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी आरोग्यविषयक कारणं सांगितली होती. मात्र, त्यांच्या राजीनाम्याचं कारण वेगळं असू शकतं असा दावा विरोधक करत होते. तसेच, धनखड काही दिवसांनी खरं कारण सांगतील असा अंदाजही विरोधी पक्षांमधील नेत्यांनी व्यक्त केला होता. मात्र, तसं झालं नाही.

हेही वाचा - Centre Extends Exemption Period for Old Vehicle: कार मालकांना मोठा दिलासा! आता 15 वर्षे जुनी वाहने आणखी 5 वर्षे रस्त्यावर धावणार

तरीही, विरोधी पक्षांचे नेते धनखड कुठे आहेत, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतच होते. राजीनामा दिल्यानंतर धनखड हे सार्वजनिकरित्या समोर आले नाहीत, कोणालाही भेटले नाहीत. तेव्हा, यात काहीतरी गौडबंगाल असल्याचा दावा विरोधक करू लागले. विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी धनखड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणाचाही धनखड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यानंतर विरोधक चक्क धनखड हे बेपत्ता झाल्याचा दावा करू लागले. मात्र, यानंतर धनखड यांच्या जवळच्या लोकांकडून त्यांच्याबद्दलची माहिती समोर आली आणि विरोधकांचे आरोप 'पराचा कावळा' ठरले. धनखड यांच्याबद्दलच्या सर्व दाव्यांमधली हवाच निघाली.

नुकतंच, माजी उपराष्ट्रपती हे टेबल टेनिस (Table Tennis) खेळण्यात व योगाभ्यास (Yoga) करण्यात व्यस्त असल्याचं वृत्त पीटीआयने प्रसिद्ध केलं आहे. धनखड यांच्या जवळच्या लोकांकडून ही माहिती मिळाली आहे. ते सध्या नियमितपणे योगाभ्यास करत आहेत. तसेच घरातील सदस्य, मित्र व उपराष्ट्रपतींच्या एन्क्लेव्हमधील कर्मचाऱ्यांबरोबर टेबल टेनिस खेळतात.
जगदीप धनखड हे सार्वजनिकरित्या कोणासमोर आले नसल्यामुळे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की “आम्ही लवकरच धनखड यांच्या प्रकृतीविषयीची माहिती सर्वांना देऊ.” 

पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना धनखड यांनी टेबल टेनिसला छंद म्हणून स्वीकारले. ऑगस्ट 2022 मध्ये उपराष्ट्रपती झाल्यानंतरही त्यांनी ते सुरू ठेवले. त्यांच्या दिनचर्येशी परिचित असलेल्यांनी सांगितले की, ते नियमितपणे उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी योगा करतात आणि हितचिंतक आणि कर्मचाऱ्यांसोबत टेबल टेनिस खेळतात. एका व्यक्तीने सांगितले की, कोणत्याही दौऱ्यावरून परतल्यानंतरही ते त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत टेबल टेनिस खेळत असत. 

हेही वाचा - ‘..पाकिस्तान अजूनही डंपर आहे, हे त्यांचं अपयश’, Rajnath Singh यांनी असीम मुनीर यांच्या 'त्या' विधानाची उडवली खिल्ली

विरोधकांनी व्यक्त केलेला संशय
काँग्रेस खासदार कपिल सिब्बल म्हणाले होते, राजीनामा दिल्यानंतर 20 दिवस उलटून गेले तरी धनखड यांची आम्हाला काहीही माहिती मिळालेली नाही. ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी नाहीत, असे सांगण्यात आले. मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या खासगी सचिवांनी फोन उचललत ते सध्या विश्रांती घेत असल्याचं सांगितलं.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून धनखड यांचा ठावठिकाणा आणि प्रकृतीची चौकशी केली होती. धनखड यांच्यावर सरकारचा काही दबाव आहे का, असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला होता.

धनखड यांचा राजीनामा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आला, जो आता संपला आहे. या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना एनडीएकडून उमेदवार बनवण्यात आले आहे, तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाकडून रिंगणात आहेत. धनखड यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 पर्यंत राहणार होता. मात्र, त्यांनी दोन वर्षे आधीच अचानकपणे राजीनामा दिल्याने तर्कवितर्क सुरू झाले.


सम्बन्धित सामग्री